नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड, हरबळ इथल्या साठवण तलाव हा परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेला आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग 361 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात मुरुम, खडी, या गौण खनिजांचे उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे. दरम्यान या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम करणाऱ्या कल्याण टोल (केटी) या कंपनीच्या कंत्राटदाराने हरबळ-सोनखेड तलाव परिसरात बेकायदेशीर नियमबाह्य उत्खनन केल्यामुळे इथल्या हजारो हेक्टर शेतीला आणि तलावाला धोका निर्माण झाला आहे. 


नियमानुसार तलाव परिसराच्या 200 मीटर आत खोदकाम करता येत नाही. परंतु संबंधित कंत्राटदराने 10 ते 15 मीटर परिसराच्या आतच नियमबाह्य खोदकाम केल्याने या तलावातील पाणी अडवणाऱ्या तलावाच्या भिंतीला आणि शेतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात तलाव परिसरातील हरबळ, मुसलमानवाडी, सोनखेड या गावांना भीषण पाणी टंचाईच्या झळा बसून हा तलाव फुटून आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतीवरील पिकांचे नुकसानही होऊ शकते. 


सदर प्रकरणात केटी कंपनीकडून तलावालगत खोदकाम करुन खोलवरचा मुरुम तो रस्त्याच्या कामासाठी वापरला जात आहे. त्यामुळे भविष्यात तलाव फुटून शेतजमिनीचे नुकसान होणार असल्याने तलावालगतचे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. त्यासाठी हरबळ, मुसलमान वाडी, सोनखेड इथल्या शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. त्यासाठी या भागातील शेतकरी एकनाथ मोरे यांनी हा प्रकार जलसंपदा विभागाला वारंवार लेखी पत्रव्यवहार करुन निदर्शनास आणून दिला. त्यानंतरही जलसंपदा विभागाच्या नांदेड कार्यालयाकडून अद्याप संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.


तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा विभागाला तक्रार देऊनही  संबंधित कंत्राटदाराकडून राजरोसपणे गौण खनिज उत्खनन मात्र सुरु आहे. दरम्यान या तक्रारीच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता के.बी.शेटे आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना माहिती घेतली असता, अशी कोणतीही तक्रार आपल्या कार्यालयाला प्राप्त झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण गावकऱ्यांनी गेल्या बऱ्याच दिवसांपासून केलेल्या प्रत्येक कार्यालयाच्या तक्रारीचा गठ्ठा एबीपी माझाच्या समक्ष ठेवला आहे. त्यामुळे या अवैध आणि बेकायदेशीर गौण खनिज उत्खननातील मुरुमाची भर आणि तलावाचे पाणी नेमके कोणत्या कार्यालयात मुरत आहे, हे तपासणं गरजेचं आहे.