नांदेड : मागील काही वर्षांत राजकारणातील नेत्यांच्या मुलांचे राजकीय पदार्पण झाले आहे. आता काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची नात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांची राजकरणात लवकरच एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  


चव्हाण दाम्पत्याच्या जुळ्या कन्या श्रीजया आणि सुजयापैकी श्रीजया यांची राजकीय क्षेत्रातील रुची मागील काही वर्षांत दिसून येत होती. अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जाहिरातमध्ये तिचे छायाचित्र आवर्जून छापले जात आहे. चव्हाण परिवाराने तिच्या राजकीय पदार्पणाची घोषणा अधिकृतपणे केलेली नाही. 


श्रीजया अशोक चव्हाण यांचे प्रोफाईल



  • देशाचे गृहमंत्री शंकरराव चव्हाण व कुसुम चव्हाण यांची नात

  • शिक्षण : LLB ,LLM कायदे विषयक शिक्षण.



चव्हाण दाम्पत्याच्या दोन्ही कन्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये झाले आहे. श्रीजयाने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असून आतापर्यंत दोन्ही कन्या आई-वडिलांच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाल्या होत्या.  पण आता अशोक चव्हाणांचा राजकीय वारस म्हणून श्रीजयाचे नाव निश्चित मानले जात असून भारत जोडो यात्रेदरम्यान तिच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


या यात्रेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी तयार करण्यात येत असलेल्या बॅनर व फलकांवरील लक्षवेधी घोषणा, त्यांवरील छायाचित्रे आणि त्यांची रचना करण्याच्या कामात श्रीजया यांचा सक्रिय सहभाग आहे.  जुन्या आणि नव्या काळातील आजी- माजी मुख्यमंत्री व मंत्र्याच्या लेकी- सुना राजकारणात उतरल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. आता आणखी एका महाराष्ट्राच्या जुन्या राजकारण्यांच्या आणि माजी मुख्यमंत्र्याच्या लेकीने राजकारणात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी कंबर कसली आहे


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण हेही नाव राजकीय मंचावर येत आहे. शंकरराव आणि कुसुमताई चव्हाण यांना  पाच कन्या आणि एक मुलगा आहे. पाच मुलींपैकी कोणीही सक्रिय राजकारणात आले नाही. अशोक चव्हाण यांनी शंकररावांचा राजकीय वारसा पुढे नेताना मागील दशकात पत्नी अमिता यांना राजकारणात आणले पण पाच वर्षांच्या आमदारकीनंतर त्या निवडणुकीतून बाजूला झाल्या आहेत. त्या अनेक वर्षे साखर कारखान्याच्या संचालक व काही काळ उपाध्यक्ष होत्या. आता त्यांच्यानंतर श्रीजयाच्या रूपाने चव्हाण कुटुंबातील दुसरी महिला राजकारणाच्या वाटेवर आहे. 


2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोकरावांच्या निवडणुकीत दोन्ही मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तीन वर्षांत चव्हाण यांची जनसंपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्यामागून लीलया सांभाळली. तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात भूमिका पार पाडलीय.


श्रीजयाच्या राजकीय पदार्पणाबद्दल चर्चा  चव्हाण परिवाराचे निकटवर्तीय तसेच काँग्रेस कार्यकत्यांत कायम सुरू असते. अलीकडे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये श्रीजया चव्हाण थेट व्यासपीठावर दिसल्यानंतर त्यांच्या राजकीय पदार्पणाचे प्राथमिक वृत्त झळकले होते. त्यामुळे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे.


संबंधित बातम्या :



BLOG | महाराष्ट्रात नवीन ठाकरे!