मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) खंडणी प्रकरणात निलंबित दोन पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत रूजू करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व आशा कोरके अशी सेवेत पुन्हा समाविष्ट करण्यात आलेल्यांची नावे आहे. अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती
नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांविरोधातील अंतर्गत चौकशीच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर दहा महिन्यांहून अधिक काळ निलंबित असलेल्या या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी परमबीर सिंह, गोपाळे आणि कोरके यांच्यासह अन्य पाच अधिकारी, संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती.
परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.
ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच
परमबीर सिंह खंडणीप्रकरणात गोपाळे आणि कोरके यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, शिंदे - फडणवीस सरकार येताच नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. आता महाविकास आघाडीच्या काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काय होते आरोप?
परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप होता. बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना मोक्काअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी परमबीर यांनी दिली होती. या प्रकरणात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी 50 लाखांची खंडणी मागितली. . याप्रकरणी कोरके व गोपाळे दोघांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.