Sanjay Biyani Murder Case : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार करत हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ माजली होती. तर या घटनेला आज एक महिना उलटला तरी पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा कोणताही सुगावा लागला नाही. त्यामुळे नांदेड येथील छोटेमोठे व्यावसायिक अद्यापही भीतीच्या छायेत व दहशतीत वावरत आहेत. दरम्यान, या हत्येप्रकरणी आठ दिवसात सीबीआय चौकशी न बसल्यास मुंबई हायकोर्टासमोर आत्मदहन करण्याचा संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी यांनी सरकारला इशारा दिला आहे. पोलिसांच्या तपासाबाबत संजय बियाणी यांच्या पत्नी असमाधानी असून त्यांनी 'एबीपी माझा'कडे आपलं मत व्यक्त केलं आहे. 


संजय बियाणी हत्या : घटनेला एक महिना पूर्ण, पत्नीचा आत्मदहनाचा इशारा
नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या त्यांच्या घरासमोर अंधाधुंद गोळीबार करून हत्या केल्याच्या घटनेस आज एक महिना उलटून गेला आहे. तरी आता पर्यंत पोलिसांना मारेकऱ्यांचा कोणताही सुगावा लागला नाही का? या खुनाचे कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांना सापडले नाही. त्यामुळे बियाणी यांच्या कुटुंबियांची संतप्त प्रतिक्रिया समोर आलीय. ज्यामध्ये संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत या केसची CBI चौकशीची मागणी केलीय. तर आठ दिवसात या हत्येप्रकरणी CBI चौकशी न बसल्यास आपण मुंबई उच्च न्यायालयासमोर रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करू असा इशारा दिलाय. 


नांदेडमधील मोठे बिल्डर, हल्लेखोरांचा शोध सुरू
संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर होते. त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बियाणी घराबाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस तपास सुरू असून हल्लेखोरांचा देखील शोध सुरू आहे. नांदेड मध्ये मागील काही दिवसांत गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून सध्या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे 


हिंदी भाषेतील 'त्या' निनावी पत्रामुळे खळबळ


नांदेडमध्ये हत्या झालेले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या घरी आलेल्या एका निनावी पत्रामुळे खळबळ माजली होती. या निनावी पत्रात बियाणी यांच्या हत्येच्या कटासंबंधी माहितीही देण्यात आली होती. बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत बनला आणि त्यामागे एका वाळू माफियाचा हात आहे. असा मजकूर या हिंदी भाषेत लिहीलेल्या पत्रात आहे. हिंदी भाषेतून पाठवण्यात आलेल्या या पत्रात लिहलं होतं की, बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुआ, जिसमे आनंद नगर से बहुत बडा दादा पांडुरंग येवले परभणी मे आया था. जिसने पहले गोरठेकर के बच्चे को मारा था, जो आताळा का रेती माफिया है, अभी भी डरसे कोई ऊसे बात नही करते. जिसने परभणी से आणे का मनसुबा करा, मकसद था, बिल्डर के काम मे कोई नही रहेना. अशा आशयाचे निनावे पत्र संजय बियाणी यांच्या घरी धडकले होते. 


नांदेडात फायनान्स कंपनीकडे सापडला अवैध शस्त्रांचा, तलवारींचा मोठा साठा


संजय बियाणी हत्येनंतर नांदेड पोलिसांकडून अवैधरीत्या हत्यार बाळगणाऱ्या गुन्हेगारांना शोधून त्यांच्याकडील हत्यार हस्तगत करण्यात येत आहेत. तर आज दहा दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डिबी पथकाने कार्यवाही करत 25 तलवारीचा मोठा साठा जप्त केला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा शिवाजीनगर पोलिसांनी गुप्त माहिती आधारे दत्तनगरातील एका फायनान्स ऑफिसमध्ये बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या कार्यालयावर छापा मारला असता, त्याठिकाणी आठ तलवारी ,एक खंडा, एक गुप्ती असे एकुण दहा शस्त्र हस्तगत करण्यात आलीत. या कारवाईत सुनिलसिंग भगतसिंग आडे (वय 23) वर्षीय हा युवक सापडला असून हा युवक फायनान्स कंपनीचा मालक आहे. दरम्यान अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी आरोपीस ताब्यात घेऊन ,गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


संबंधित बातम्या


Nanded News : हत्या झालेले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या घरी निनावी पत्र, हिंदी भाषेतील पत्रामुळे खळबळ


Nanded News : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्येसंदर्भात आलेले 'ते' पत्र खोडसाळपणाने, SIT च्या तपासात निष्पन्न