Nanded News : नांदेड येथे आठवडाभरापूर्वी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार करत हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ माजली होती. तर या घटनेला आठ दिवस उलटले तरी पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा कोणताही सुगावा लागला नाहीये. त्यामुळे नांदेड येथील छोटेमोठे व्यावसायिक अद्यापही भीतीच्या छायेत व दहशतीत वावरत आहेत. अशातच संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र आल्याची माहिती मिळतेय.


हिंदी भाषेतील निनावी पत्रामुळे खळबळ


नांदेडमध्ये हत्या झालेले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या घरी आलेल्या एका निनावी पत्रामुळे खळबळ माजलीय. या निनावी पत्रात बियाणी यांच्या हत्येच्या कटासंबंधी माहिती देण्यात आली. बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत बनला आणि त्यामागे एका वाळू माफियाचा हात आहे. असा मजकूर या हिंदी भाषेत लिहीलेल्या पत्रात आहे. आठवड्याभरापूर्वी बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर हत्या झाली होती. त्यानंतर बियाणी यांचं कुटुंब आणि नांदेडमधील व्यावसायिक दहशतीच्या छायेत आहेत. त्यातच हे पत्र आल्यानं त्यांच्या पायाखालीच जमीन सरकली आहे.


काय लिहलंय पत्रात?


हिंदी भाषेतून पाठवण्यात आलेल्या या पत्रात लिहलंय की, बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुआ, जिसमे आनंद नगर से बहुत बडा दादा पांडुरंग येवले परभणी मे आया था. जिसने पहले गोरठेकर के बच्चे को मारा था, जो आताळा का रेती माफिया है, अभी भी डरसे कोई ऊसे बात नही करते. जिसेने परभणी से आणे का मनसुबा करा, मकसद था, बिल्डर के काम मे कोई नही रहेना. अशा आशयाचे निनावे पत्र संजय बियाणी यांच्या घरी धडकलेय. त्यामुळे पहिलेच दहशतीच्या छायेत वावरत असणारे बियाणी कुटुंबीय या पत्रामुळे आणखी भयभीत झालंय.


खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार
संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर होते. त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बियाणी घराबाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस तपास सुरू असून हल्लेखोरांचा देखील शोध सुरू आहे. नांदेड मध्ये मागील काही दिवसांत गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाला असून आता शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे