Jalgaon RTO : विभागीय परिवहन कार्यालयातील अनागोंदी कारभारापासूनचे ते दलालांच्या विळख्यांचे अनेक किस्से चर्चेत असतात. त्यातील काही प्रकार समोरही येतात. असाच एक अजब प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार संजय सावकारे यांच्या कारची मालकी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावे करण्यात आली आहे. जळगाव आरटीओत हा प्रकार घडला असून कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही तांत्रिक चूक आहे की घोटाळा आहे? अशी चर्चा सुरू झाली आहे.
आमदार संजय सावकारने यांनीदेखील या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नाही. आपली कार परस्पर अनिल परब यांच्या नावे कशी लागली याचेच आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत आरटीओ कार्यालयात चौकशी केली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. एखाद्या आमदाराची गाडी अशा प्रकारे परस्पर दुसऱ्याच्या नावे होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असाही संतप्त सवाल त्यांनी केला. हा प्रकार म्हणजे आरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परिवहन अधिकारी शाम लोही यांनी म्हटले की, संजय सावकारे यांची गाडी परिवहन मंत्री यांच्या नावे परस्पर करण्यात आली असल्याची ही सत्य बाब आहे. या प्रकरणी प्राथमिक तपासात ऑनलाईन सिस्टममधील काही त्रुटींचा एका अज्ञात व्यक्तीने दुरुपयोग करून हा सगळा प्रकार जाणीवपूर्वक केला असल्याचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले. एखादे वाहन दुसऱ्याच्या नावे करताना काळजी घ्यायला हवी असेही त्यांनी म्हटले. या घटनेबाबत आम्हीही सखोल चौकशी करीत आहोत. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणी दोषींवर चौकशी अंती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- वाघिणीची शिकार करून नखे, शीर काढून जमिनीत पुरले; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
- Omicron Variant : महाराष्ट्रातील ओमायक्रॉन बाबत सर्वकाही, जाणून घ्या तज्ज्ञांकडून एकाच क्लिकवर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha