Nana Patole on Mahayuti : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र सामोरे जाणार आहोत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी काही मोठा विषय नाही. महायुतीकडे चेहरा तरी आहे का? हा केवळ खोक्यांचा चेहरा असल्याची सडकून टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, उद्यापासून आमच्या महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत. त्यामध्ये आम्ही जागावाटप संदर्भामध्ये ठरवणार आहोत. अल्पसंख्यांक उमेदवार द्यायचा की नाही निर्णय तेव्हाच घेऊ असेही ते म्हणाले.


यांना साधी लाज देखील वाटत नाही


दरम्यान, बदलापूर घटनेवर नाना पटोले यांनी भाष्य केले. पटोले म्हणाले की,या सरकारची आता कीव येऊ लागली आहे. यांचं राज्यकारण करायचं नाही याचं भान आम्हाला आहे. सत्तेतील लोक मात्र राजकारण करत आहेत. गुन्हेगार शिंदे, खासदार शिंदे, मारणारा शिंदे, मुख्यमंत्री शिंदे या सगळ्या प्रकरणांमध्ये शिंदे दोषी कसे अशी खोचक विचारणा नाना पटोले यांनी केली. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रामध्ये विविध घटना घडल्या आहेत. देवेंद्र फडणीसांच्या राज्यातही घटना घडल्या आहेत. यांना साधी लाज देखील वाटत नाही. यावर ते राजकारण करत आहेत. एन्काऊंटर झाला की आत्महत्या झाली याबाबत प्रकरण हायकोर्टामध्ये आहे. असे अनेक कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी रुजू केल्याची टीका त्यांनी केली. खऱ्या आरोपीला मदत करण्यासाठी माझ्या मुलाला मारले गेल्याचा आरोप आई-वडिलांनी केला असल्याचे नाना पटोले म्हणाले. ही घटना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लपवत आहेत. जे दोषीत आहेत त्या सगळ्यांचे एन्काऊंटर करा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. 


कुठे गेले तर खड्ड्यातून जावं लागते इतका मोठा विकास महाराष्ट्रात


दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की त्यांना माझा प्रश्न आहे की ते इव्हेंट करतात ते पैसे जनतेचे आहेत. 27 कोटी रुपयांचा खर्च पंतप्रधानांच्या दौऱ्यावर करण्यात आला. हा खर्च भाजप शिवसेनेच्या खिशातून करण्यात आला होता का? अशी विचारणा नाना पटोले यांनी केली. देशाला न परवडणारी महागाई आहे, जनतेची लूट सुरू असून केवळ योजना आणून तोच पैसा लुबाडला जात असल्याचे ते म्हणाले. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणे हा यांचा धंदा असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. 


दरम्यान नाना पटवली यांनी निवडणूक आयोगाच्या बैठकीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, सरकारचा दबाव इतका आहे की ते काहीच करू शकत नाहीत. निवडणूक आयोगाने त्यांना तंबी दिली आहे. सरकार धोकेबाज बनला आहे असेही ते म्हणाले. लाडकी बहिणी योजनेवर त्यांनी बोलताना सांगितले कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायला त्यांच्याकडे नाहीत. कुठे गेले तर खड्ड्यातून जावं लागते इतका मोठा विकास महाराष्ट्रात झाला आहे. विकास फक्त यांचा झाला आहे. या नेत्यांचा झाला आहे. याच्यापेक्षा जास्त पैसे या योजनेमध्ये द्यायला हवेत अशी मागणी त्यांनी केली.