अहमदनगर : काल जामखेडच्या खर्डा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) आगामी काळात मंत्री होतील, असे संकेत दिले होते. तर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी त्यांचे "भावी मुख्यमंत्री, असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आलेले आहेत. यामुळे रोहित पवार महाराष्ट्राचे पुढे मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. आता यावर रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. विधानसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा आशयाचे बॅनर झळकले आहेत. आता रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवारांच्या समर्थकांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री, असा उल्लेख करण्यात आला. याबाबत विचारले असता मलाच याबाबत विशेष वाटते की, लोक एवढ्या मोठ्या पदाबाबत माझ्या नावाची चर्चा करत आहेत. हे जनतेचे प्रेम आहे. पण, बॅनर लावून काही होतं नसतं त्यासाठी खूप काम करावं लागतं. मी कोणत्याही पदासाठी काम करत नाही. महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी मी काम करतो, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.
शरद पवारांचे सूचक वक्तव्य
शरद पवार यांनी म्हटलं होतं की, माझी पाच वर्षे आमदार म्हणून गेल्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण हे मला मिळत गेलं. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो, सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री राहिलो. वसंतदादांचा सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो. केवळ एकदाच मुख्यमंत्री झालो नाही तर चार वेळेला मुख्यमंत्री झालो. रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी", असं म्हणत शरद पवार यांनी रोहित पवारांच्या आगामी मंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं. शरद पवारांनी स्वतःचा राज्यमंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास सांगत एक प्रकारे रोहित पवार यांचा देखील मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास तर सांगितला नाही ना? अशी चर्चा आता रंगत आहे.
आणखी वाचा
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला