Nana Patole : काँग्रेसमध्ये कुठेही गडबड नाही. आमच्या पक्षात लोकशाही आहे. आम्ही सगळेजण मिळून काम करत असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. वज्रमूठ सभेची आम्ही पूर्ण तयारी केली आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीची मोठी सभा होणार असल्याचे पटोले म्हणाले. महाविकास आघाडीच्या समन्वयाची सत्ताधाऱ्यांना भीती असल्याचे पटोले म्हणाले. नाना पटोले आज (15 एप्रिल) एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. 


छत्रपती संभाजीनगरच्या सभेला मी नव्हतो. मात्र, आमचे मराठवाड्यातील सगळे नेते उपस्थित होते. मी जाणार होतो. पण मला दिल्लीत बोलावले होते. दुसऱ्या दिवशी मला सुरतला जायचे होते. त्यामुळं मी छत्रपती संभाजीनगरच्या सभेला उपस्थित राहिलो नाही. मी कुठेही नाराज नसल्याचे पटोले म्हणाले. महाविकास आघाडीच्या समन्वयाची सत्ताधाऱ्यांना भीती असल्याचे पटोले म्हणाले. गैरसमज होऊ नये यासाठी नागपुरच्या वज्रमूठ सभेसाठी सगळ्या खुर्च्या सारख्याच ठेवल्या असल्याचे नाना पटोले म्हणाले. राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. तरुणांना खोटी आश्वासने दिली जात असल्याचे पटोले म्हणाले. मंत्रालयापासून खालपर्यंत राज्यात भ्रष्टाचाराची मालिका सुरु असल्याचे पटोले म्हणाले. 


देशाची सुरक्षा धोक्यात


सत्यपाल मलिक यांनी पुलवामाच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती अंगावर काटा आणणारी आहे. आज देश धोक्यात आला आहे. देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे पटोले म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसने खूप कष्ट सहन केलं आहे. जनतेच्या कोर्टात भाजप नापास झाली आहे. सावरकर हा आमचा विषय नसल्याचे नाना पटोले म्हणाले.


अजित पवार असं काही करणार नाहीत 


अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी  केलं होतं. यावर बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. भाजपविरोधी जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहोत. अजित पवार असं काही करणार नाहीत हा आमचा विश्वास असल्याचे पटोले म्हणाले. 


आता डोक्यावरुन पाणी गेलं, आता सगळे विरोधक एकत्र होतील


आता डोक्यावरुन पाणी गेलं आहे. त्यामुळं विरोधक आता एकत्र होतील असे नाना पटोले म्हणाले. विरोधकांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. याच्या आधारावर दहशत पसरवण्याचे काम केले जात आहे. विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम सुरु असल्याचे पटोले म्हणाले. यावेळी सगळे विरोधक एकत्र होतील आणि भाजपला सत्तेच्या बाहेर करतील असेही पटोले म्हणाले.