Namita Thapar Forbes : फोर्ब्सच्या (Forbes) 20 आशियाई उद्योजक महिलांचीच यादी जाहीर झाली असून या यादीत तीन भारतीयांचा समावेश आहे. त्यात पुण्याच्या एमक्योर फार्माच्या इंडिया बिझनेसच्या कार्यकारी संचालक नमिता थापर (Namita Thapar) यांचा समावेश आहे. नमिता थापर यांचा या यादीत सामावेश झाल्याने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर पुण्याचं नाव उंचावलं आहे. त्यांच्यासोबतच स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षा सोमा मंडल, आणि होनासा कंझ्युमरच्या सह-संस्थापिका आणि मुख्य नवोपक्रम (Innovation) अधिकारी गझल अलघ यांचा देखील समावेश आहे. भारतातील कोरोनाच्या काळात अनिश्चितता असूनही ज्या महिलांनी आपल्या व्यावसायात नवी धोरणं आखली आणि मोठी उंची गाठली आहेत, अशा आशियाई 20 महिलांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रातील महिला
या यादीतील काही महिला शिपिंग, रिअल इस्टेट आणि बांधकाम यांसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत आहेत तर काही तंत्रज्ञान, औषध आणि कमोडिटी यासारख्या क्षेत्रात नवनवीन शोध घेत आहेत. या यादीतील इतर महिला ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, तैवान आणि थायलंडमधील आहेत.
कोण आहे नमिता थापर?
नमिता थापर या एमक्योर फार्माच्या इंडियाच्या (Emcure Farms India) कार्यकारी संचालक आहेत. त्यांचा जन्म पुण्यात झाला आहे. पुण्यातील महविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातून त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी फुका स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आहे. कोरोनाच्या काळात महिलांचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांनी नमितासोबत अनकंडिशन युवरसेल्फ नावाचा यूट्यूबवर टॉक शो सुरू केला. इकॉनॉमिक टाइम्स अंडर 40 अवॉर्ड, बार्कले हुरुन नेक्स्ट जेन लीडर अवॉर्ड, इकॉनॉमिक टाइम्स 2017 वुमन अहेड अवॉर्ड, असे अनेक अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत.
शार्क टॅंक इंडियामध्ये परीक्षक
काही महिन्यापूर्वी सोनी टीव्हीवरील शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमात त्या परीक्षक होत्या. हा कार्यक्रम भारतातील स्टार्टअप व्यावसायिकांसाठी होता. सोनीवरील या कार्यक्रमामुळे नवोदित उद्योजकांना त्यांच्या उद्योग वाढवण्यासाठी फंड दिला गेला. मोठ्या कंपन्यांनी स्टार्टअपसाठी मदत करावी आणि त्यात गुंतवणूक करावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश होता. याच कार्यक्रमात नमिता थापर यांनी देखील अनेक लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
गझल अलघ, सोमा मंडल यांचाही समावेश
गझल अलघची कंपनी मामा अर्थ नावाची कंपनी आहे. त्या होनासा कन्झूमरच्या सह-संस्थापिका आणि मुख्य नवोपक्रम अधिकारी आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठातून बीसीए पूर्ण केले. पुढे त्यांनी व्हिज्युअल आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केले तर सोमा मंडल या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या सध्याच्या अध्यक्षा आहेत. सोमा मंडल या सेलच्या पहिल्या महिला कार्यकारी संचालक तसेच पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.