नांदेड: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने आजपासून महाराष्ट्रातील प्रवास सुरू केला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या यात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी प्रवेश केला. आज सकाळी गुरुद्वाराचे दर्शन घेऊन राहुल गांधी यांनी आपल्या यात्रेला सुरुवात केली. जाणून घेऊया या यात्रेतील महत्त्वाचे मुद्दे, 


देगलूरच्या गुरुद्वाराचं दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात


राहुल गांधी यांनी आज सकाळी देगलूरच्या यादगारी बाबा गुरुद्वाराला भेट दिली आणि त्याचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांनी देशवासियांना गुरु पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आणि भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. 


राष्ट्र सेवादलाचे  कृष्णकुमार पांडे यांचं हृदयविकाराने निधन 


भारत जोडो यात्रेची सुरवात झाल्यानंतर राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. कृष्णकुमार पांडे यांच्या निधनामुळं अवघ्या यात्रेवर दु:खाचं सावट दिसून आलं. भारत जोडो यात्रेच्या शिबिरात खासदार राहुल गांधी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कृष्णकुमार पांडे हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसचे पाईक राहिले. त्यांनी महाराष्ट्र सेवादलाचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. आज सकाळी भारत जोडो यात्रा सुरु होताच कृष्णकुमार पांडे हे तिरंगा हातात घेऊन जयराम रमेश आणि दिग्विजयसिंह यांच्यासोबत चालत होते. काही वेळानंतर त्यांनी त्यांच्या हातातला तिरंगा झेंडा दुसऱ्या कार्यकर्त्याकडे दिला आणि ते मागून चालत असताना अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


भालचंद्र मुणगेकर आणि हुसेन दलवाई यांचा सहभाग 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये जेष्ठ अर्थतज्ञ डॉ भालचंद्र मुणगेकर तसेच माजी खासदार हुसेन दलवाई हे सहभागी झाले. त्यांनी भारत जोडो यात्रेमुळे भाजप हादरली असून येत्या 2024 च्या निवडणूकीत या यात्रेचा परिणाम दिसून येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक पोशाखात मुलींची हजेरी



महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर राहुल गांधी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून अनेक मुली तुळशीचं झाड त्याचबरोबर श्रीफळ घेऊन राहुल गांधींच्या स्वागतासाठी थांबले आहेत. त्याचबरोबर अनेक शाळकरी मुलीसुद्धा राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव करून महाराष्ट्राच्या विषयावर राहुल गांधी यांचं स्वागत करताना एक युवक दिसतोय.


नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेतेही पदयात्रेत सहभागी



राहुल गांधींची भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई दिसत आहे. त्यासोबतच आज राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान आदी नेते पायी चालत आहेत. 


भोपळा येथील कॉर्नर सभा आटोपून राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस पूर्ण


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या आजच्या दिवसाचा प्रवास संपला आहे. नांदेडमधील भोपळा येथील कॉर्नर सभा होणार होती, पण राष्ट्रीय सेवा दलाचे समन्वयक कृष्णकुमार पांडे यांचे निधन झाल्याने कया ठिकाणी शोकसभा घेण्यात आली आणि प्रवास थांबवण्यात आला.