गणेशची पत्नी गुडिया शाहू आणि भाऊ अंकित आणि सिद्धू यांचाही आजी-नातीच्या हत्येत सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अॅट्रोसिटीचाही गुन्हा नोंदवला आहे.
शनिवारी नागपुरातल्या न्यूज पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या 55 वर्षीय आई उषा आणि दोन वर्षांची मुलगी राशी यांची हत्या करण्यात आली होती. शनिवार संध्याकाळपासून आजी-नात बेपत्ता होत्या, त्यानंतर रविवारी त्यांचे मृतदेह नागपूर-उमरेड रस्त्याजवळ नाल्यात एका गोणीत गुंडाळलेले सापडले होते.
बेपत्ता होण्यापूर्वी उषा राशीला घेऊन घराजवळच्या ज्वेलर्सकडे चिमुकलीसाठी पायपट्टी घेण्यासाठी गेल्या होत्या. परत येताना शिव किराणा स्टोअर्सजवळ त्या काही वेळ थांबल्या होत्या. मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरीच न परतल्यामुळे कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
नागपुरातील आजी-नातीची हत्या आर्थिक वादातून
रविवारी सकाळी दोघींचे मृतदेह घरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर एका नाल्यात आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेचे धागेदोरे पोलिसांना कांबळे कुटुंब राहत असलेल्या पवनपुत्रनगर परिसरात मिळाले. पोलिसांना कांबळे कुटुंबियांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर शिव किराणा स्टोअर्स अँन्ड डेली नीड्सच्या समोर उभ्या असलेली महिंद्रा xuv गाडी संशयास्पदरित्या धुतलेली आढळली.
पोलिसांनी चौकशी केली असता कारमध्ये पोलिसांना काही रक्ताचे डाग मिळाले. पोलिसांनी किराणा दुकानचा मालक गणेश शाहूला ताब्यात घेत विचारपूस करायला सुरुवात केली.
नागपूरमध्ये पत्रकाराच्या आई आणि मुलीची हत्या
गणेशच्या घराच्या वरच्या मजल्यावर अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. इतकंच नाही, तर किचनमधील बेसिन आणि बाथरुमच्या नळाजवळही रक्ताचे डाग आढळले. छतावरच्या पंख्याच्या एका पात्यावरही रक्ताचे डाग आढळले. तसेच परिसरातील काही लोकांनी शनिवारी संध्याकाळी उषा कांबळे यांना शिव किराणा स्टोअर्सजवळ पाहिलं होतं.