नागपूर : 2 हजार रुपयांचा हिरा 50 लाखांना विकल्याचा आरोप नागपुरातील ज्वेलर्सनी केला आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने अनेकांना गंडा घातल्याचं समोर येत आहे. थोडी-थोडकी नव्हे, तर मूळ किमतीच्या अडीच हजार पट किमतीने हिऱ्यांची विक्री केल्याचं उघड झालं आहे.

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मॉडेल्सना मढवून हिऱ्यांचा बाजार मांडणारा नीरव मोदी. बेल्जियमच्या बाजारातून हिरे आणून जयपूरच्या पॅलेसमध्ये प्रदर्शन मांडणारा नीरव मोदी. पण हाच नीरव मोदी एक नंबरचा फ्रॉड असल्याचा दावा त्याच्याच माजी कर्मचाऱ्यानं केला आहे. कधीकाळी नीरवचा मामा मेहुल चोक्सीच्या 'गीतांजली ब्रॅन्ड'मध्ये माजी व्यवस्थापकीय संचालक असलेल्या संतोष श्रीवास्तव यांनी हा आरोप केला आहे

दुसरं उदाहरण थेट नागपुरातून... पवन कोठारी हे सराफ आहेत. पण मेहुल चोक्सीनं आपल्यालाही गंडवल्याचा दावा कोठारी करत आहेत. 100 रुपयांची वस्तू असेल, तर त्याचं ब्रँन्डिंग असं काही करायचं, की त्याची किंमत 5 हजारच झाली पाहिजे. अशाप्रकारे ग्राहक आणि फ्रँचायझी या दोघांची तो फसवणूक करायचा.

गीतांजली समुहाने देशभरात अशा अनेक फ्रँचायझी दिल्या असून, त्यातून मोठी फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्रँडच्या नादात लोक वाट्टेल ती वस्तू वाट्टेल त्या किंमतीला खरेदी करतात आणि त्याचाच फायदा नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसारखी माणसं उठवतात.

त्यामुळे दिखाओ पे ना जाओ... अपनी अकल लगाओ...