नागपूर : विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. कोरोना काळातल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या सर्व शंका गैरलागू ठरतील असं अॅप विकसित करून त्याद्वारे परीक्षा घेण्याची तयारी सुरु केली आहे. RTMNU परीक्षा असे या अॅपचे नाव असून त्याद्वारे घेतली जाणारी परीक्षा केवळ सुरक्षितच ठरणार नाहीये तर ऑनलाईन परीक्षेच्या वेळी काही विद्यार्थ्यांकडून केले जाणारे संभाव्य गैर प्रकार टाळण्याचे खास तंत्रही या अॅपमध्ये ठेवण्यात आले आहे, असा दावा केला जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही, ही दक्षता ही या अॅपमध्ये घेण्यात आल्याचा विद्यापीठाचा दावा आहे.


विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेसाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गुगल प्ले किंवा विद्यापीठाच्या संकेत स्थळावरून हे अॅप डाउनलोड करता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून परीक्षा फक्त सोयीस्करच नाही तर पारदर्शक ही होणार असा दावा विद्यापीठाने केला आहे.


आरटीएमएनयू परीक्षा अॅपची वैशिष्ट्ये
# या अॅपवर विद्यार्थ्यांना एक मॉक पेपर सोडवता येणार असून तो विद्यार्थ्यांना अॅपच्या विविध अप्लिकेशनचा सर्व व्हावा यासाठी असणार आहे.
# या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी 50 बहुपर्यायी प्रश्न दिले जाणार आहे, त्यापैकी 25 प्रश्ने सोडवायचे आहेत.
# एखाद्या विद्यार्थ्याने जास्त प्रश्न सोडविले तरी त्याचे निकाल बेस्ट ऑफ ट्वेंटी फाईव्ह या पद्धतीने लावले जाणार आहे.
# या अॅपवर साइन इन केल्यानंतर एक तासाची बहुपर्यायी परीक्षा देताना जर मध्येच कनेक्टीव्हटी बंद झाली. तरी विद्यार्थ्याला सहज त्याचा पेपर सोडवता येणार आहे.
# एका तासात पेपर पूर्ण केल्यावर जेव्हा केव्हा कनेक्टिव्हीटी उपलब्ध होईल तेव्हा तो पेपर सबमिट करता येणार. म्हणजेच कनेक्टिव्हीटी गेली म्हणून पेपर अर्धवट राहणार नाही.
# विद्यार्थ्याने एकदा पेपर सुरु केले तर त्यासाठी त्याला फक्त एक तासच उपलब्ध होणार. कोणताही विद्यार्थी एका तासाच्या वर उत्तर निवडण्याची प्रक्रिया चालवू शकणार नाही.
# पेपर सोडवताना विद्यार्थ्याने केलेली हालचाल, इकडे तिकडे पाहणे आणि अवती भवती बोलणे हे सर्व अॅप चित्रित करणार असल्याने पेपर सोडवताना विद्यार्थ्याला पारदर्शकता पाळावीच लागणार आहे.


कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षेच्या वेळी पारदर्शकता पाळली नाही, उत्तरं पाहून लिहिली तर अॅपवर चित्रित झालेल्या ऑडिओ व्हिडीओच्या मदतीने खास समिती त्या विद्यार्थ्यांबद्दल निर्णय घेणार आहे. एवढेच नाही तर या अॅपमुळे परीक्षेचे निकाल ही लवकर लावणे विद्यापीठाला शक्य होणार आहे. कोणत्याही वर्गाचा ऑनलाईन परीक्षेचा अंतिम पेपर पूर्ण झाल्याच्या चार ते पाच दिवसात त्याचा निकाल जाहीर करू असा दावा कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांनी केला आहे.


राज्यात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा संदर्भात अभूतपूर्व नाट्यमय घडामोडी झाल्या. मात्र, आता जेव्हा अनेक विद्यापीठांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेसाठी आपापली तयारी सर्वांसमोर आणली आहे. तेव्हा परीक्षांची पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा नाहकच उपस्थित केला गेला होता की काय अशी शंका निर्माण झाली आहे. आता एकदा तंत्रज्ञानाच्या मदतीने होणाऱ्या या परीक्षा सुखरूप व्हाव्या आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात पुढे वाटचाल करता यावी एवढीच अपेक्षा.