Teachers Constituency Elections Nagpur : नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा झाल्यापासून विभागात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र अर्ज मागे घेण्याचा दिवसही चर्चेत राहिला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 5 शिक्षकांनी आपले अर्ज मागे घतले. यात महाविकास (MVA) आघाडीच्या अधिकृत उमेदवार शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे (Gangadhar Nakade) यांच्यावर अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली. सध्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे. या उमेदवारांमध्ये भाजप समर्थित आमदार नागो गाणार, गेल्या निवडणुकीत फक्त 2 हजार मतांनी पराभूत झालेले अपक्ष उमेदवार राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सुधाकर अडबाले यांचा कॉंग्रेसचा समर्थन मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.


तसेच सकाळपर्यंत अर्ज मागे घेण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सतीश इटकेलवार हे अचानक 'नॉट रिचेबल' झाले. तसेच काही माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे बोलून दाखवले होते. आज, दुपारी तीनपर्यंतच अर्ज मागे घेण्याची मुदत असताना इटकेलवार हे संपर्काबाहेर गेल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करत पत्र जारी केले. तसेच शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनीही सतीश इटकेलवार यांना पक्षातून निलंबन केल्याची सांगितले.


बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची खेळी


बंडखोरी टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शेवटच्या दिवसापर्यंत आपले समर्थन कोणाला हे जाहीर केले नव्हते आणि शेवटच्या घटकेत त्यांनी नागो गोणार यांना पाठिंबा देणार असल्याचे पत्र जारी केले. मात्र हे पत्र 6 जानेवारीलाच तयार झाले होते. मात्र पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी ही कृती केली.


महाविकास आघाडीही अलर्ट


महाविकास आघाडीनेही बंडखोरी आणि कार्यकर्त्यांना शेवटपर्यंत संभ्रमात ठेवले. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर नागपूरची जागा कॉंग्रेस लढणार नसल्यावर शिक्कामोर्तब केला. मात्र तोपर्यंत महाविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांनी आपले अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते. बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी सोडली तर सर्वच उमेदवारांनी आपले अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते.


गाणारांच्या नामांकनावेळी भाजपचे प्रमुख नेते अनुपस्थित


भाजपतर्फे शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून नागो गाणार यांचे नाव फायनल करण्यात आले. याचं पत्रही 6 जानेवारीलाच तयार होता. मात्र पक्षाने शेवटच्या घटकेला हा पत्र जाहीर केला. मात्र उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा कोणीही मोठे नेते नव्हते. दुसरीकडे अमरावती येथे होत असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे नामांकन भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दोघेही उपस्थित होते. भाजपने औरंगाबाद येथे स्वतःचा उमेदवार दिला. नागपुरातही भाजप स्वतंत्र उमेदवार देऊ शकते अशी चर्चा होती. मात्र ती फक्त चर्चाच ठरली.


अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये


आज सोमवारी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 शिक्षकांपैकी 5 जणांनी अर्ज मागे घेतले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये निळकंट उईके, अतुल रुईकर, मृत्युंजय सिंह, गंगाधर नाकाडे, डॉ. मुकेश पुडके यांचा समावेश आहे. यानंतर आता नागपूरच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत 22 उमेदवार रिंगणात आहे.


30 जानेवारीला मतदान


भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 30 जानेवारी 2023 रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये  सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.


ही बातमी देखील वाचा...


गोंधळलेल्या अवस्थेत शिवसेनेच्या गंगाधर नाकाडेंची माघार; महाविकास आघाडीतील एकमेव उमेदवाराची माघार