नागपूर : नागपुरातल्या प्रसिद्ध 'प्राईड हॉटेल'मध्ये मुंबईकर तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. अलका वळंजू असं मयत 28 वर्षीय तरुणीचं नाव आहे.


मुंबईतल्या खारघरमध्ये राहणारी अलका नेस्ले कंपनीत नोकरी करत होती. कंपनीच्या कामानिमित्त मंगळवारी ती मुंबईहून नागपुरात गेली होती. सकाळी तिच्या आईवडिलांनी बऱ्याचदा तिला फोन केला. मात्र तिचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी हॉटेलच्या रिसेप्शनला फोन लावला.

हॉटेल कर्मचाऱ्यांनी दार ठोठावूनही काहीच हालचाल न आढळल्याने नेस्ले कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिच्या रुमचं दार उघडण्यात आलं. त्यावेळी अलका बेडवर मृतावस्थेत आढळली. तिच्या तोंडाला फेस आला होता.

या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अलकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. हॉटेलकडून कोणीही बोलायला तयार नाही.