नागपूर : अवैध धंद्यांवर अपेक्षित कारवाई न करणे आणि कर्तव्यात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत 2 पोलीस उप निरीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी ही कारवाई केली.
निलंबित पोलीस सावनेर, खापा, कळमेश्वर आणि मौदा पोलिस स्टेशनचे आहेत. या भागात अवैध धंदे, जुगार, सट्टा आणि ताश क्लब चालत असल्याची माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा निलंबित कर्मचाऱ्यांवर आरोप होता. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी निलंबनाची कारवाई केली.
नागपूर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांकडून अवैध धंद्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता. त्यानंतर पोलीस अधिक्षक बलकवडे यांनी कडक पाऊल उचलत सात कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे.