Nagpur Accident नागपूर: नागपूरच्या ऑडी हिट अँड रन प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक खुलासा केला आहे. अपघातावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मुलगा संकेत बावनकुळे हा गाडीतच होता, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. अपघातावेळी कारमध्ये तीन लोकं होते. त्यात अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे यांचा त्यात समावेश आहे. तर संकेत बावनकुळे हा देखील गाडीत होता, असे तपासात पुढे आले असून पोलिसांनीही हे मान्य केले आहे. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता. अशी माहिती,झोन-2 चे डीसीपी राहुल मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
नेमकं काय म्हणाले नागपूर पोलीस
या प्रकरणातील अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते. तर अर्जुन वाहन चालवत होता, म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला संकेत बावनकुळे गाडीत होता, हे आम्हाला स्पष्ट नव्हते, मात्र नंतर तपासामध्ये ही बाब समोर आली आहे की, संकेत बावनकुळे हा देखील गाडीत होता. अर्जुन आणि रोनीतला ताब्यात घेऊन या विषयी आम्ही जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत त्या गाडीत होता, असं माहित पडलंय. म्हणून काल रात्री त्याला बोलावून त्याची चौकशी केलीय. प्रकरणातील तिघे कुठून येत होते, याचा तपास केले असून ते लाहोरी हॉटेल जिथे बार ही आहे त्या ठिकाणाहून येत असल्याचे उघड झाले आहे. किंबहुना आमच्यावर कोणताही राजकीय नेत्याचा अथवा पक्षाचा दबाव नाही. सीसीटीव्ही फुटेज डिलीट केले असे आरोप होत आहे, मात्र हे सत्य नाही. असे कुठे ही आढळले असल्याचे डीसीपी राहुल मदने म्हणाले.
दोषींवर कारवाई व्हावी! -चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली आहे. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते. अपघात घटनेतील गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटिव्ही फुटेज तपासावेत, कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. परंतु या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा