Nagpur Accident नागपूर: नागपुरात रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या एका ऑडी कार ने दोन अन्य कार आणि एका दुचाकीला धडक (Nagpur Accident) दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघाताच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असताना आता या घटनेला राजकीय वळण लागले आहे. अपघातातील ऑडी कार ही भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मुलाचीच असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.           


नेत्याच्या मुलाला वेगळा अन् सर्व सामान्यांना वेगळा न्याय का?- सुषमा अंधारे 


नागपुरच्या रामदास पेठ येथे घडलेलं हिट अँड रन चे प्रकरण मधील गाडीचा नंबर पोलिसांनी का नोंदवला नाही? माझा थेट आरोप आहे की,  या गाडीमध्ये संकेत बावनकुळे हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा अपघातावेळी गाडीत होता. तर ही गाडी प्रताप कामगार यांच्या मालकीची असून गाडीचे  मालकही ते आहेत. मात्र, अपघाताच्या वेळी पोलिसांनी गाडी नंबर नोंद करून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे या प्रकरणात वेगळा न्याय का दिला? गाडी आणि संबंधित लोकांना पोलिसांनी ताब्यात का घेतले नाही? एका नेत्याच्या मुलाला वेगळा न्याय आणि सर्व सामान्यांना वेगळा न्याय का? असा सवाल  ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. 


अपघातातील गाडी माझ्या मुलाचे नावावर- चंद्रशेखर बावनकुळे 


दरम्यान, या प्रकरणावर आता स्वत: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.    यावेळी बावनकुळे  म्हणाले की, या अपघातातील गाडी माझ्या मुलाचे नावावर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी. पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही वेगळा न्याय देता कामा नये. किंबहुना, जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे. परमेश्वराच्या कृपेने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. तर या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तसेच याबद्दल मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांशी आतापर्यंत बोललेलो ही नसल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासत काय माहिती पुढे येते आणि दोषींवर नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


हे ही वाचा