नाशिक : बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून (Baramati) निवडणूक लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते (NCP Ajit Pawar Group) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.
अजित पवार यांनी या आधीही ते बारामतीमधून निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढणार नाही, असे संकेत दिले होते. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी तशाच प्रकारचं वक्तव्य केल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे अजित पवार भावनिक राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. आता याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी अजितदादा आमचे कॅप्टन आहेत. ते बारामतीतूनच निवडणूक लढतील, असे वक्तव्य केले आहे.
अजितदादांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही
छगन भुजबळ यांनी आज येवला येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अजित पवार आमचे कॅप्टन आहे. त्यांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही. ते बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढतील आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत अजित पवार बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
राज्यपालांच्या दौऱ्याकडे छगन भुजबळांची पाठ
दरम्यान, राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. राज्यपालांनी स्वतः लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्याकडून विकासकामे, योजनांची अंमलबजावणी यांसह विविध समस्यांबाबत आढावा घेतला. मात्र राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळांनी पाठ फिरवली. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मला राज्यपालांच्या दौऱ्याची आधी कल्पना नव्हती. माझ्या मतदारसंघात काही विकासकामांचे उद्घाटन बाकी आहे. आचारसंहिता लागू होण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे उद्घाटन करण्यासाठी मी मतदारसंघात जात आहे. पण राज्यपाल यांच्याबाबत आदर आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंत्री छगन भुजबळ यांचे सूतोवाच