Nagpur Rains : नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात (Vidarbha Rain) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा खरीप हंगाम (Kharif Season) 90 टक्के संपल्यात जमा असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केला आहे. सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या एका विशेष समितीने नागपूर जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. दोन दिवस चाललेल्या या दौऱ्यानंतर केदार यांनी नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामाची 90 टक्के पिकं अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याचा किंवा नष्ट झाल्याचा दावा केला आहे.


यावर्षी मृग बहाराची संत्री किंवा मोसंबी खायला मिळणार नाही 


फक्त कापूस किंवा सोयाबीन हे विदर्भातील पारंपरिक पीकच नाही. तर नागपूर जिल्ह्यात विशेषत्वाने घेण्यात येणाऱ्या संत्रा आणि मोसंबीच्या बागांनाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचा दावा केदार यांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे झाडावरील मोसंबी किंवा संत्री एक तर गळाली आहे किंवा गळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यावर्षी मृग बहाराची संत्री किंवा मोसंबी खायला मिळणार नाही असे केदार म्हणाले. 


सरकारने खुल्या हाताने शेतकऱ्यांना मदत करावी


नागपूर शहराच्या अवतीभवती होणारी भाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे नष्ट झाल्याचे काँग्रेसच्या पाहणी समितीने म्हटले आहे. राज्यात नव्याने आलेल्या सरकारने खुल्या हाताने शेतकऱ्यांना मदत करावी. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या महापुराच्या काळात एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे निकष बदलून ज्या पद्धतीने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली होती. त्याच धर्तीवर विद्यमान शिंदे- फडणवीस सरकारने मदत करावी अशी मागणी ही सुनील केदार यांनी केली आहे. 


विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता


विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात (Vidarbha Rains) काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती. विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने विदर्भाची चिंता वाढवलीय. विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. याशिवाय मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rains : पुढील तीन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भात विजांच्या कडकडाटासह कोसळणार!


Maharashtra Rain Live Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पाहा ठिकठिकाणचे अपडेट्स