YCM University :  नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्यावतीने (Nashik Mukta Vidyapeeth) नुकत्याच घेण्यात आलेल्या बी.ए. तृतीय वर्षाच्या (BA Exam) राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेत मनुस्मृतीसह (Manusmriti) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि रामदास स्वामी यांचा संबंध दर्शवणारे आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामुळे विद्यापीठाने माफी मागावी, अशी मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या विद्यापीठाने घेतलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत  प्रश्न क्रमांक 2 (अ) मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतिला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा' असा तर प्रश्न क्र. 3 (ई) मध्ये 'मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा' असे आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आले आहेत. 


ही कृती शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याच्या तत्त्वाला हरताळ फासण्याचा प्रकार आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाव असलेल्या विद्यापीठात संविधानविरोधी अभ्यासक्रमाचा समावेश कसा आणि कोणामार्फत करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली नसल्याचे इतिहास संशोधक आणि उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही 16 जुलै 2018 च्या निकालात म्हटले आहे.असे असताना असा प्रकारे खोटा इतिहास कोण जाणून बुजून शिकवत आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.


मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मनूस्मृतीसंदर्भात केलेले विवेचन घटनेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास सांगून बदनामी केली जात आहे. या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने संविधानविरोधी मनुस्मृती ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा, असा प्रश्नपत्रिकेत उल्लेख करून विद्यापीठामार्फत मनुस्मृतीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिण्यात आलेल्या खोट्या इतिहासाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न विद्यापीठ करीत आहे. याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने निषेध करण्यात आला. 


असे संविधानविरोधी अभ्यासक्रम विद्यापीठाने तत्काळ रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली. विद्यापीठाने विद्यार्थी आणि जनतेची माफी मागावी. यापुढे अशा चुका होणार नाहीत, असे जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अंनिसचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील आणि कार्याध्यक्ष माधव बावगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


अंनिसचे कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की अशा प्रकारे येणाऱ्या पिढीवर चुकीचे संस्कार करणे योग्य नाही. यातील दोषी वर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. पुढील परीक्षेत असे प्रश्न विचारले जाऊ नयेत यासाठी कडक धोरण तयार करणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI