Nagpur News नागपूर उपराजधानी नागपुरात (Nagpur News) भूमाफियांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून आता पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. भूमाफिया (Land Mafia) आणि अवैध सावकारांविरोधात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) खास शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांकडून अक्षरक्ष: तक्रारींचा पाऊस पडल्याचे बघायला मिळाले. यावेळी नागरिकांकडून जमिनी संदर्भातल्या शेकडो तक्रारी पोलिसांसमोर मांडण्यात आल्या आहे.


शहरातील भूमाफिया विरोधात एकूण 252 तक्रारी या शिबिराच्या माध्यमातून पोलिसांना प्राप्त झाल्या असून त्यापैकी 30 प्रकरणांमध्ये तत्काळ गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या विशेष मोहिमेच्या माध्यमातून भूमाफियांचे शहरात वाढते लोन आणि दहशत या निमित्याने नव्याने समोर आले आहे. परिणामी या खास शिबिराचे नागरिकांकडून कौतुक केलं जातच आहे. शिवाय प्राप्त तक्रारी नुसत्याच फाईलमध्ये अडकून न राहता या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून सर्वसामान्यांना न्याय देखील मिळाला पाहिजे, अशी माफक अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.


भूमाफियांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर!  


नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या पुढाकाराने भूमाफिया व अवैध सावकारांपासून त्रस्त नागरिकांसाठी सोमवारी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच दिवशी तक्रारींचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यात भूमाफियांविरोधात अडीचशेहून अधिक तक्रारी आल्या, तर अवघ्या पाच तासांत  30 प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता भूमाफियांविरोधात कडक कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना यावेळी दिल्या आहेत.


तर या प्रकरणी कुणी हलगर्जी केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचा सज्जड दम ही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक प्रकरणात राजकीय वरदहस्त लाभला असताना आता यातील किती भूमाफियांवर कठोर कारवाई होऊन पीडित नागरिकांना न्याय मिळणार हा एक सवालही या निमित्याने उपस्थित केला जात आहे. मात्र पोलिसांनी उचलेल्या या महत्वपूर्ण पाऊल आणि या शिबिराचे नागरिकांकडून स्वागत केल्या जात आहे. 


पहिल्याच दिवशी खास शिबिरात तक्रारींचा पाऊस 


पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी तक्रारी केल्या असून आता संबंधित पोलीस स्टेशनला तीन दिवसात या तक्रारींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल या प्रकरणांचा आढावा घेणार आहे. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये भूमाफीयांनी एकच जमीन अनेक लोकांना विकल्याच्या, तसेच जबरदस्तीने जमिनीवर ताबा घेतल्याच्या तक्रारी आहेत.


सोबतच प्लॉट विकणाऱ्यांनी पैसे घेऊनही रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केल्याच्या, तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड विकल्याच्याही तक्रारी आहेत. तर यात परिमंडळ एक अंतर्गत 32, परिमंडळ दोन अंतर्गत 63, तीन अंतर्गत 17,  चार अंतर्गत सर्वाधिक 106 आणि परिमंडळ पाच अंतर्गत 34 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या