नागपूर : हायप्रोफाइल मॉडेल्स आणि महिलांसोबत मैत्रीचे आमिष दाखवत आंबटशौकीन पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.


ठाण्यातून चालवल्या जाणाऱ्या या रॅकेटमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा शहरातील काही महिलाही कार्यरत होत्या. यासाठी 'निशा फ्रेंडशिप' नावाचा क्लब स्थापन करण्यात आला होता.

मॉडेल्स, एअर होस्टेस, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांशी तुम्हाला गप्पा मारता येतील आणि मोबदल्यात पैसेही मिळतील, असं सांगितलं जायचं. त्यानंतर संबंधित महिला फ्रेंडशिप क्लबमध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या पुरुषांसोबत फोनवर बोलायच्या आणि त्यांना भेटण्याचं आमिष दाखवून क्लबच्या विविध अकाऊंट्समध्ये रक्कम भरण्यास सांगायच्या. ही रक्कम काही हजारांपासून लाखभर रुपयांपर्यंत असायची.

मुख्य आरोपी रितेश भैरुलाल याने पुण्यातील विविध बँकांमध्ये तब्बल 28 अकाऊंट्स उघडले होते. अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक अशा अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवलं जायचं. एकदा पैसे भरले की आरोपी ते दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करायचे.

नागपूरच्या एका व्यक्तीकडून सव्वा लाख रुपये लुबाडले गेले. औरंगाबादमधील एका व्यक्तीकडून साडेचार लाख रुपये उकळले गेले. पोलिसांच्या मते राज्यभरात ही संख्या शेकडोच्या घरात असून फसवणुकीची रक्कम काही कोटींच्या घरात असू शकते. फसवणूक झाल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीने अनेक जण लाखो रुपये गमावूनही तक्रार करत नव्हते.