Nagpur News नागपूर : राज्यासह विदर्भात गेल्या काही दिवसापासून उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठताना दिसत आहे. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह मध्येच पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) दमट वातावरण आणि उकड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. अशातच, या त्रासापासून काही अंशी दिलासा मिळावा म्हणून काही नागरिक जलतरण तलाव, नदी, तलावात पोहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. मात्र यातूनच अलिकडे नदी, तलावाच्या पाण्यात बुडून अनेक जण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहे.
मागील आठवड्याभरात उजनी, इगतपुरी, प्रवरागनर, किनवट तालुक्यातील मारेगाव येथे पाण्यात बुडून अनेकजण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच, आता नागपूर (Nagpur) आणि वर्धा जिल्ह्यात (Wardha) देखील अशाच काहीशा दुर्दैवी घटना घडल्या आहे. यात पहिल्या घटनेत नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरात तलावात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील मोहता स्वीमिंग पूल येथे 15 वर्षीय बालकाचा जलतरण तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय.
तलावात पोहण्याचा मोह बेतला जीवावर
नागपूर जिल्ह्यातील कुही परिसरात असलेल्या मटकाझरी तलावाजवळ काही तरुण पार्टी करायाला गेले होते. दरम्यान, त्यातील काही जणांना नजीकच्या तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी तलावाच्या पाण्यात प्रवेश केला. मात्र त्यांना पाण्याच्या अंदाज न आल्याने एका पाठोपाठ एक या पाण्यात बुडन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात जितेंद्र इस्ताराम शेंडे, संतोष किशोर बावणे, आणि 12 वर्षीय निषेद रातू पोपट असे या घटनेत मृत्यू पावलेल्या तिघांचा समावेश आहे. हे तिघेही नागपूरातील भरतवाडा आणि वाठोडा परिसताली रहिवासी असून या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
जलतरण तलावात बुडून 15 वर्षीय बालकाचा मृत्यू
अशीच एक दुर्दैवी घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील मोहता स्वीमिंग पूल येथे घडली आहे. यात 15 वर्षीय बालकाचा जलतरण तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय. रेहान मेहनुद्दीन चौधरी असं मृत बालकाच नाव आहे. नवव्या वर्गात शिकणारा रेहान हा सायंकाळी आईसोबत स्विमिंग शिकायला हिंगणघाटच्या जलतरण तलाव येथे गेला होता. त्याचा स्विमिंगचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे. या जलतरण तलावात असलेले पाणी हिरवे असल्यामुळे बुडालेल्या मुलाला शोधणे देखील कठीण झाले. स्मिमिंगसाठी चार ट्रेनर असून सुद्धा घटना घडल्याने हिंगणघाट शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांच्या कारवाईकडे सऱ्यांचे लक्ष
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरवात केलीय. रेहान चौधरी यांचे वडील हे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून तीन वर्षांपासून हिंगणघाट येथे बेकरीचा व्यवसाय करत होते. या घटनेमुळे मात्र सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात असून जलतरण शिकवणीला घेऊन पालकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या