Nagpur Crime News : महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांची कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे पालन आणि नंतर ते खरेदी करण्याच्या नावावर तब्बल 1.65 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर शहर पोलिसांच्या (Nagpur Police) आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) महारायत अॅग्रो इंडिया कंपनीच्या (Maharayat Agro India Private Limited) एका संचालकाला अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच मे 2020 मध्ये बजाजनगर पोलीस ठाण्यात महारायत आणि रायत अॅग्रो कंपनीचे संचालक सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते, हनुमंत जगदाळे आणि इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.


अशी केली फसवणूक...


कडकनाथ जातीचे कोंबड्यांच्या काळ्या रंगाच्या चिकनला मध्य भारतात विशेषत: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये खूप मागणी आहे. 900 रुपये प्रति किलोपर्यंतच्या दराने हे चिकन विकले जाते. कंपनीने कडकनाथ जातीच्या पिल्लांची संख्या वाढवणे आणि नंतर ती पिल्ले मोठी होऊन कोंबड्यात रुपांतर झाल्यानंतर खरेदी करण्याच्या योजनेच्या नावावर महारायत अॅग्रो कंपनीने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुन घेतली. त्यांच्या जाळ्यात अडकून शहरातील 111 शेतकऱ्यांनी आरोपींच्या कंपनीत एकूण 1.64 कोटी रुपये गुंतवले. आरोपींनी पैसे तर घेतले, मात्र व्यवसाय केला नाही. 


पोलिसांकडे करा तक्रार


पीडितांनी बजाजनगर पोलिसात तक्रार केली. त्याचप्रमाणे सांगली, पुणे, पालघर, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकमध्येही कंपनीने जाळे पसरवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने तक्रार नोंदवण्यात आली होती. कोल्हापूरच्या एका प्रकरणात आरोपी कारागृहात बंद होते. हे प्रकरण अनेक दीर्घ कालावधीपासून थंड बस्त्यात होते. आर्थिक गुन्हे शाखेने सुधीर मोहितेला कोल्हापूरच्या तुरुंगातून प्रॉडक्शन वॉरंटवर अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. महारायत कंपनीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी ईओडब्ल्यूचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यभरात या कंपनीने 1500 हून अधिक शेतकऱ्यांना चुना लावला आहे. फसवणुकीचा आकडा 500 कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.


राज्यात अनेक कंपन्यांकडून कडकनाथ कोंबडी घोटाळा?


सांगली जिल्ह्यातही एका कंपनीकडून कडकनाथ कुक्कुटपालन ही योजना सुरु करण्यात आली होती. पैसे गुंतवा, पक्षी पाळा, अंडी आणि कोंबड्या विका, असं या योजनेचं स्वरुप होतं. सुरुवातीला यात मालकास 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. पक्ष्यांसाठी लागणारा खाद्यपुरवठा कंपनीकडूनच केला जात होता. यातून तयार होणारे पक्षी आणि अंडी हेसुद्धा कंपनी ठराविक दराने घेऊन जाणार होती. यातून शेतकर्‍याला एका वर्षात पावणे तीन लाख देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. दरम्यान, गुंतवणुकीत रक्कम दुप्पट, तिप्पट करण्याच्या नावाखाली या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील हजारो शेतकर्‍यांची लूट या कंपनीने केली होती.


ही बातमी देखील वाचा


Sanjay Raut : राज्य सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का? संजय राऊतांचा हल्लाबोल