Nagpur News नागपूर : नागपुरात (Nagpur News) गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. दरम्यान शहरातील सर्वात मोठा आणि मध्यवर्ती भागात असलेला अंबाझरी तलावातील (Ambazari Lake) पाणीसाठयात मोठी वाढ झाली आहे. अशात आज शुक्रवारपासून पावसाची सततधार सुरू असल्याने नागपूरच्या अंबाझरी तलावात साठवलेल्या पाण्याची पातळी सध्या 316.20 मीटर झाली आहे. अंबाझरी तलावाची ओवर फ्लो पातळी 316.24 मीटर आहे. त्यामुळे आता अंबाझरी तलाव ओवरफ्लो होण्यास अवघे 0. 04 मीटर एवढं अंतर उरले आहे. संभाव्य पाणीपातळी लक्षात घेता महापालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत दक्षता घेतली जात आहे.


महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अंबाझरी तलावातून पाणी ओवरफ्लो होऊन नागपूरच्या अनेक वस्त्यांमध्ये महापूर आला होता. कधीनव्हे ते अंबाझरी तलावाच्या पाण्यामुळे शेकडो वस्त्या आणि हजारो घरे पाण्याखाली गेली होती. काही तासांच्या पावसाने उपराजधानी नागपूरची एकच दाणादाण उडवली होती. गेल्यावर्षी घडलेली घटना आता पुनः होऊ नये म्हणून याप्रकरणी आता  महापालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत दक्षता घेतली जात आहे. अंबाझरी तलाव ओवरफ्लो होण्यासाठी आता फक्त 0. 04 मीटर एवढं अंतर शिल्लक असल्याने, तसेच अंबाझरी तलावातून पाणी ओवरफ्लो होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनानं अनेक पंपांच्या साहाय्याने अंबाझरी तलावातून पाणी बाहेर नाग नदीच्या पात्रात सोडणे सुरू केले आहे.


अंबाझरी तलावाची पाण्याची पातळी कायम राहावी आणि ती ओवरफ्लो होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून ही दक्षता घेतली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अंबाझरी तलावातून पाणी ओवरफ्लो होऊनच नागपूरच्या अनेक वस्त्यांमध्ये महापूर आला होता.


गोसीखुर्द धरणाचे  11 गेट अर्धा मीटरने  सुरू


मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर भंडारा जिल्ह्यात सर्वत्र जलमयस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली होती. धरणाचा पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी मागील आठवड्यात धरण प्रशासनाने सर्व 33 गेट उघडून 3 लाख 83 हजार पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग केला होता. मात्र, आता पूरपरिस्थिती नियंत्रणात असून गोसीखुर्द धरण प्रशासनानं आता पाण्याचा विसर्गही कमी केला आहे. सध्या धरणाचे 11 गेट अर्धा मीटरनं सुरू असून त्यातून 46 हजार 795 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


हे ही वाचा