Nagpur News नागपूर : राज्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections 2024) अद्याप संपलेल्या नाहीत. मात्र त्यापूर्वीच उपराजधानी नागपुरात (Nagpur News) महायुतीच्या (Mahayuti) दोन पक्षांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde) यांच्या विरोधात त्याच मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविका आभा पांडे (Abha Pandey) यांनी जोरदार मोर्चा उघडला आहे. दोघांमधील वादाला कारण ठरले आहे ते रस्त्यांच्या मधोमध असलेल्या एक अतिक्रमणाविरोधात झालेली कारवाईचे आणि त्यानंतर जवळच्या एका हनुमान मंदिर आणि बौद्ध विहाराला अतिक्रमणासंदर्भातच मिळालेली नोटीसचे. या वादात आता दोन्ही बड्या नेत्यांकडून अनेक आरोप-प्रत्यारोप आणि टीकेचा फैरी झाडल्या जात आहे. त्यामुळे निकालापूर्वीच नागपुरात महायुतीत दोन नेत्यांमधील हा वाद राजकीय वातावरणात चर्चेचा विषय ठरला आहे.


महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये जुंपली    


पूर्व नागपूरच्या वाठोडा परिसरातील गिड्डोबा नगरमध्ये रस्त्याच्या मधोमध काही अतिक्रमण असून ते काढण्यात यावे, अशी तक्रार तेथील स्थानिक नागरिकांनी केली होती. नागरिकांच्या या तक्रारीच्या आधारावर काही दिवसांपूर्वी नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या मधोमध करण्यात आलेला हे अतिक्रमण पाडले होते. त्यानंतर दुसऱ्या एका तक्रारीच्या आधारावर नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी जवळच असलेल्या हनुमान मंदिर आणि बौद्ध विहारालाही पाडण्याची नोटीस बजावली. तेव्हापासूनच भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका आभा पांडे यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू झालाय.


अतिक्रमण विरोधी कारवाईचा वाद शिगेला 


रस्त्याच्या मधोमध केलेल्या अतिक्रमण संदर्भातील कारवाई प्रकरणी आमदार कृष्णा खोपडेंनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून बौद्ध विहार आणि हनुमान मंदिराला अतिक्रमण सांगून पाडण्याची नोटीस बजावली, असा आरोप आभा पांडे यांनी केला आहे. आजपासून आभा पांडे यांनी परिसरातील हनुमान मंदिर आणि बौद्ध विहार समोर ठिय्या आंदोलन ही सुरू केलं आहे.


तर दुसऱ्या बाजूला कृष्णा खोपडे यांनी आभा पांडे यांच्यावर पलटवार करत पांडे यांनी सरकारी नियम आणि मुद्द्यांची समज नाही, त्या घटिया राजकारण करत असून नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणेच आधी रस्त्याच्या मधोमध असलेलं अतिक्रमण पाडलंय आणि त्याच नियमांच्या आधारे जवळच असलेल्या मंदिर आणि बौद्ध विहार संदर्भात कारवाई करत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता अतिक्रमण संदर्भातील कारवाईमुळे शहरातील दोन बडे नेते आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे.   


इतर महत्वाच्या बातम्या