GMC and IGGMC Nagpur : नागपूरच नव्हे तर विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ येथील रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (मेडीकल) GMC आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) IGGMC येथे उपचारासाठी येतात. मात्र मागील पाच वर्षांपासून मेयोचे 250 आणि मेडिकलने वाढविलेले 500 बेड मंजूरीविना आहेत. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे बेड आहेत, पण मनुष्यबळ नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनाच अटेन्डंटची कामे करावी लागत असल्याचे या दोन्ही रुग्णालयातील विदारक चित्र आहे.


मेयो (IGGMC) सर्जिकल कॉम्प्लेक्स एप्रिल 2017मध्ये रुग्णसेवेत रुजू झाले. मेयोच्या जुन्या 590 बेडमध्ये या कॉम्प्लेक्समुळे 250 बेडची भर पडली. अस्थिव्यंगोपचार, ईएनटी, नेत्र व शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया कक्षासोबतच वॉर्डही उपलब्ध झाले. मात्र, जुन्या बेडच्या तुलनेत मंजूर पदांमधील परिचारिकांची सुमारे 115 पदे, चतुर्थ कर्मचाऱ्यांची 200 पदे, फार्मासिस्टची सहा पदे, तंत्रज्ञाची पाच पदे याशिवाय इतरही पदे रिक्त असताना या नव्या बेडवरील कामाचा ताण सर्वांवर पडला आहे. याची माहिती मेयो प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) वेळोवेळी दिली. वाढीव पदांची मागणी केली. परंतु अद्यापही परवानही मिळाली नाही. कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा ताण वाढल्याने रुग्णसेवाही प्रभावित होत आहे.


जीएमसीमध्ये 1400 खाटांनाच मंजुरी


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) 1400 बेड्सना मंजुरी प्राप्त आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता मेडिकलने बेडची संख्या वाढवून दोन हजार केली. असे असतानाही वैद्यकीय प्रशासनाने 1900 बेडच्या मंजुरीसाठी अर्ज केला. परंतु शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही.


475 परिचारिकांच्या खांद्यावर 833 खाटांची जबाबदारी


मेयो (IGGMC) रुग्णालयामुळे जुने व नवीन बेड मिळून 833 बेड आहेत. परंतु त्या तुलनेत परिचारिकांची संख्या केवळ 475 आहे. यातील साधारण 10 ते 15 टक्के सुटीवर राहत असल्याने तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे प्रमाण मागे पडले आहे. वाजवीपेक्षा कामाचा ताण वाढल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. हीच स्थिती कर्मचाऱ्यांची आहे.


औषधींचाही तुटवडा


शासकीय रुग्णालयाच्या ओपीडी (OPD)व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यासोबतच नियमित तपासणी आणि इतर आजारांवर उपचारासाठी रुग्ण येतात. मात्र डॉक्टरांकडून लिहून देण्यात आलेली औषधं अनेकवेळा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी औषध विक्रेत्यांकडून खरेदी करावी लागतात. याशिवाय डॉक्टरांनी कोऱ्या कागदावर लिहून दिलेले काही विशेष ब्रॅन्ड तर रुग्णालय परिसरातील औषध दुकानावर मिळत नसून बाहेरील खासगी दुकानातच मिळतात.


ही बातमी देखील वाचा


RTMNU Elections : विद्यापीठ अधिसभा पदवीधर निवडणूक : अंतिम मतदार यादीत गंभीर चुका, पत्ता नसलेले मतदार साडेसात हजारांवर