Nitin Gadkari : भारताची भविष्यातील सामाजिक सुरक्षा, आर्थिक भागीदारी आणि रोजगार निर्मितीसाठी तरुणाईने आपले योगदान द्यावे. तसेच आर्थिक विषमता दूर सारून आर्थिक समता प्रस्थापित करावी असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी केलं. विद्यार्थी वर्गाची ध्येय ही भारताच्या आर्थिक वाढीसाठी पोषक आहेत. युवकांची व्यक्तिमत्वे, व्यावसायिक दृष्टिकोन, संघकार्याची भावना, तंत्रस्नेही कौशल्ये अजून विकसित व्हायला हवीत असेही गडकरी म्हणाले. वनामती नागपूर  येथे आयोजित 'मेगा सीए स्टुडन्ट कॉन्फरन्स '  या भारतीय सनदी लेखापाल संस्थेनं आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. भारताला आता ऊर्जेचा आयातदार होण्यापेक्षा ऊर्जेचा निर्यातदार होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक गोष्टीचे लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. 


पाणी, ऊर्जा, बांधकाम, तंत्रज्ञान हे रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे घटक


सनदी लेखापाल यांची देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्वाची अशी भूमिका आहे. त्यांचे लेखापरीक्षण अहवाल पाहूनच देशाची आर्थिक स्थिती जगापुढे मांडता येऊ शकते. कायद्याप्रती सन्मान, पारदर्शकता ठेवून हे लेखापरीक्षणाचे क्षेत्र अजून समृद्ध करत रहावे या  शुभेच्छा गडकरींनी विद्यार्थ्यांना दिल्या. नवीन तंत्रज्ञान, आर्थिक शाश्वती, कच्च्या मालाची उपलब्धता  आणि नवीन बाजारपेठांची निर्मिती हे भांडवली गुंतवणुकीसाठी आवश्यक असून याच्या निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घावा. त्याचप्रमाणे पाणी, ऊर्जा, बांधकाम, तंत्रज्ञान हे रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचे असे घटक आहेत त्यांचे सशक्तीकरण होणे आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले. भारताला आता ऊर्जेचा आयातदार होण्यापेक्षा ऊर्जेचा निर्यातदार होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक गोष्टीचे लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. यासाठी मानवी लेखापरीक्षण, कार्यशैलीच लेखापरीक्षण, गुणवत्तेचे लेखापरीक्षण ,व्यवसायाचे लेखापरीक्षण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


कोळशाला पर्याय म्हणून बांबूचा विचार करणे गरजेचं


देशात सरकारी आणि खासगी तत्वावर नवीन प्रकल्प निर्माण होणे गरजेचे आहे. यातूनच देशाचा जीडीपी सुधारणार आहे. भारत आर्थिक महासत्ता होण्यासाठी वाटचाल करीत राहील. देशात ऊर्जेची प्रचंड अशी मागणी असून कोळसा उत्पादनावर मोठा भार पडत आहे. यासाठीच कोळशाला पर्याय म्हणून बांबूचा विचार करणे गरजेचे आहे. बांबूचा पर्यायी वापर केल्यास देशात दोन लाख कोटींची अर्थव्यवस्था निर्माण होईल. ओसाड जागेवर बांबू निर्मितीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.


देशातील विकास कामासाठी निधीची कमतरता नसून, त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा. यावर आपण ठाम असून वायफळ गोष्टीवर भरमसाठ खर्च टाळता यावा यासाठी सुद्धा केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्य स्थितीत सामान्य जनता सुद्धा विकास कामात अप्रत्यक्षरीत्या सहभागी होत असून याचाच एक भाग म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर आपल्या मंत्रालयाच्या काही सेवा नोंदणीकृत झालेल्या आहेत. या मार्फत सामान्य जनता गुंतवणुकीचा वापर करून विकास कामात सहभागी होत आहे , असे गडकरी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nitin Gadkari : अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या, एक-दोन वेळेस तर त्यांना मारण्याची वेळही आली; नितीन गडकरींनी सांगितल्या त्या आठवणी