नागपूर: रस्त्यातील झाड अर्धे कापून बुंधा तसाच ठेवल्याने, अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. नागपूर महापालिकेच्या या जीवघेण्या कारभाराविरोधात पीडित महिलेच्या मुलीने सोशल मीडियातून थेट मुख्यमंत्र्यांना साद घातली आहे.

आई गमावलेली ही तरुणी रस्त्याचं काम नीट व्हावं, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सोशल मीडियातून पाठपुरावा करत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नागपुरातील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या अगदी समोर 4 बाय 4 फूट लांबी- रुंदीचा रस्ता  नव्याने केलेला आहे.

रस्त्याचा हा छोटासा भाग दुरुस्त होण्यासाठी साधना पुराडभट यांना त्यांचा जीव गमवावा लागला. 4 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास शशीकांत आणि साधना पुराडभट हे दाम्पत्य हॉटेलमध्ये जेवून घरी परतत होते. मात्र, जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्यासमोर अचानकच रस्त्याच्या मधोमध एका उंचवट्यावरुन त्यांची प्लेझर दुचाकी उचलून खाली कोसळली.

अचानक गाडी उचलून खाली पडल्याने साधना पुराडभट गंभीर जखमी झाल्या. एक आठवडा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या साधना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जेव्हा साधना पुराडभट यांची अभियंता मुलगी मधुराने आई बाबांच्या अपघाताचं कारण शोधणं सुरु केलं, तेव्हा तिला महापालिकेच्या ढिसाळपणामुळे आई गेल्याचं दिसून आलं.

महापालिकेने कधीकाळी रस्त्याच्या मधोमध असलेलं झाड कापताना अक्षम्य दुर्लक्ष केल्याने, आई वडिलांचा अपघात झाल्याचं मधुराच्या लक्षात आले.

महापालिकेने काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेले झाड कापलं. मात्र, त्याचा बुंधा धोकादायक पद्धतीने तसाच ठेऊन दिला. कंत्राटदरानेही रस्त्याचे डांबरीकरण करताना त्या उंचवट्याकडे दुर्लक्ष करत ते तसेच राहू दिले.



मात्र हा बुंधा पुराडभट दाम्पत्याच्या जीवावर बेतला. 4 मार्च रोजी पुराडभट दाम्पत्याचा भीषण अपघात झाला. दुर्दैव म्हणजे घटनास्थळ महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघे ३०० मीटर अंतरावर आहे.

एक आठवडा रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 11 मार्चच्या रात्री साधना पुराडभट यांचा मृत्यू झाला.

कुटुंबावर इतका मोठा आघात झाल्यानंतर पुराडभट कुटुंबीयांनी महापालिकेकडे रस्त्याची तक्रार केली. सुरुवातीला महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेरीस आई गमावणाऱ्या मधुराने पुन्हा दुसऱ्यासोबत असे घडू नये यासाठी सोशयल मीडियाच्या माध्यमातून थेट मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना घटनेची माहिती दिली.


इंस्टाग्रामवर उंचवट्याच्या स्वरुपात असलेल्या झाडाच्या बुंध्याचे फोटो शेअर केले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने महापालिकेला कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी महापालिकेने रस्ता खोदून झाडाचा बुंधा बाहेर काढला आणि तिथे डांबरीकरण केले.


4 बाय 4 फुटाचा रस्ता दुरुस्त करुन घेण्यासाठी, आईला गमावणाऱ्या मुलीला थेट मुख्यमंत्र्यांचे दार का ठोठावे लागले? महापालिका किंवा खालची यंत्रणा त्यांची कामे नीट का करत नाहीत? असे सवाल आता मधुराने सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

महापालिकेने मात्र या घटनेबद्दल थातूरमातूर उत्तरं देऊन, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. यापुढे काळजी घेऊ असं संतापजनक उत्तर महापौरांनी दिलं.

दरम्यान, मधुरा पुराडभट यांनी आपल्या आईसाठी न्यायाची लढाई सुरुच ठेवली आहे. अपघातानंतर आम्ही प्रश्न उपस्थित केल्यामुळे महापलिकेने रस्ता दुरुस्त केला असला, तरी महापालिकेच्या मुख्यालयापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर हा उंचवटा कधीच कोणाच्या लक्षात का आला नाही, दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याविरोधात कारवाई का केली जात नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.