नागपूर: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्या गाजावाजाद्वारे केलेल्या वृक्षारोपणाची, अवघ्या काही दिवसांत काय अवस्था झाली आहे, याचा अत्यंत विदारक चित्र नागपुरात पाहायला मिळतंय.
नागपूर महानगरपालिकेने लावलेल्या रोपांना गाई- म्हशींनी फस्त तर केलंच, पण दुर्दैवी बाब म्हणजे सुदाम नगरी परिसरात खुद्द महापालिकेने लावलेल्या रोपांवर जमीन समतल करण्याच्या नावाखाली जेसीबी चालवले आहेत. आता अधिकारी चूक झाली, पुन्हा होणार नाही असे म्हणत, या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
एक जुलै ते सात जुलै या सातच दिवसात मुनगंटीवार आर्मीने राज्यात 4 कोटींपेक्षा जास्त रोपांची लागवड करत ठरवलेलं उद्दिष्ट गाठलं आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन या मोहिमेची स्तुती केली.
मात्र आज वृक्षारोपणाच्या या महामोहिमेचा अंत होत आहे. हिरव्यागार रोपांबद्दल सरकारी क्रूरतेचे अत्यंत विदारक चित्र समोर येत आहे.
नागपूरच्या सुदाम नगरी भागात अंबाझरी उद्यान ते नागपूर विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला नागपूर महापालिकेने 1 जुलै रोजी वृक्षारोपण केले होते. महापालिकेचे उपमहापौर आणि महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी रोपं लावली होती. घाई- गडबडीत अधिकाऱ्यांनी काही रोपं खड्ड्यात टाकून त्यावर माती टाकण्याची तसदी ही घेतली नाही. त्यामुळे बुंध्याजवळ काळी कीड लागलेली काही रोपं अंतिम घटका मोजत आहेत. तर उर्वरित बहुतांशी रोपं गाई म्हशींनी फस्त केली आहेत. आज वृक्षारोपणाच्या खड्ड्यात फक्त रोपांचे सांगाडे म्हणजेच सुकलेले देठ शिल्लक आहे.
मात्र, या वृक्षारोपणाची सर्वात दुर्दैवी आणि संतापजनक बाब म्हणजे ज्या ठिकाणी गाजावाजा करत वृक्षारोपण झाले, त्याच ठिकाणी दोन दिवसानंतर महापालिकेने जेसीबी, टिप्पर लावून जमीन समतलीकरणाचे काम हाती घेतले. सुदामनगरी भागात असलेला जुना खड्डा बुजवण्यासाठी ते आवश्यक असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
मात्र, याच समतलीकरणाच्या कामामुळे जेसीबीखाली चिरडून अनेक रोपं नाहीशी झाली आहेत. त्यामुळे जिथे समतलीकरणाचे काम हाती घ्यायचे होते अशा ठिकाणी महापालिकेने वृक्षारोपणाचे काम घेतलेच का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबद्दल पालिकेचे अधिकारी चूक झाली, पुन्हा होणार नाही असे सांगून महिनाभरानंतर याच्यापेक्षा चांगले वृक्षारोपण करून दाखवू असा दावा करत आहेत.
"खदानीचा खड्डा भरण्यासाठी जेसीबी लावले, मात्र, जेसीबीमुळे झाडे नष्ट झालेली नाहीत. गरज भासल्यास शिल्लक झाडे दुसरीकडे स्थलांतरित करू, पूर्ण निगा ठेऊ, आता चूक झाली पुढे अशी चूक होणार नाही" असं धरमपेठ झोनचे उपायुक्त महेश मोरोणे यांनी सांगितलं.
नागपूर राज्याची उपराजधानी आहे. इतर शहरांच्या तुलनेत थोडी जास्त हिरवीगारही आहे. मात्र, सरकारी उद्दिष्ट गाठण्यासाठी नागपुरात ही वारंवार वृक्षारोपणाच्या महामोहिमा हाती घेतल्या जातात. अधिकाऱ्यांना संख्यात्मक उद्दिष्ट दिलं जातं. त्यामुळेच संख्या गाठण्यासाठी चुकीच्या ठिकाणी रोपे लावून त्यांचा बळी दिला जातो. मात्र, यातून सध्या काय होतो ह्याचा विचार आता मुनगंटीवार आणि त्यांच्या सुज्ञ अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे.
नागपुरात गेल्या वर्षी केलेले वृक्षारोपणाचे वास्तवही एबीपी माझाने दाखविले होते. आता अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या वृक्षारोपणाचे हे विदारक वास्तव आहे.