मेट्रोचं काम सुरु असताना शेकडो क्विंटल वजनाचा लोखंडी गर्डर, सुरक्षेसाठी खाली असलेल्या बॅरिकेट्सवर पडला. यातील तीन बॅरिकेट्स आणि लोखंडी गर्डरमधून बाहेर निघालेले रॉड अतिशय वेगाने रस्त्याच्या दिशेने पडले. त्याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीला बॅरिकेट्स आणि रॉडची जोरदार धडक बसली.
या अपघातात अमी जोशी, त्यांची सासू साधना जोशी आणि दीड वर्षांची मुलगी मीरा जोशी जखमी झाल्या. अमी जोशी यांना गंभीर दुखापत झाली असून दोघी जणी किरकोळ जखमी आहेत.
घटनेच्या वेळी त्याठिकाणी गार्ड्स नव्हते. मेट्रो अत्यंत वजनदार मशिनच्या मदतीने काम करतं. त्याच ठिकाणी रस्त्यावरुन वाहतूक सुरु असते. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने पुरेशा प्रमाणात गार्ड्स नेमावे आणि लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, मेट्रो रेल प्रशासनाने या घटनेमागे त्याठिकाणी निर्माण कार्य करणाऱ्या आयटीडी कंपनीची आणि सुरक्षेसाठी नेमलेल्या कन्सल्टंटची चूक असल्याचं मान्य केलं आहे. जो लोखंडी गर्डर स्थिर असायला हवा होता तो एका बाजूला झुकलाच कसा याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं मेट्रो रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
नागपुरात मेट्रो रेल्वेचं जाळं सुमारे 38 किलोमीटरचं आहे. आज जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांवर किंवा चौकांवर मेट्रोचे निर्माणकार्य सुरु आहे. भर उन्हात आणि पावसात त्रास सहन करुन भविष्यात दर्जेदार वाहतूक व्यवस्था मिळेल, या आशेवर नागपूरकरांनी या निर्माणकार्याला सहकार्य केलं आहे. मात्र नागपूरकरांच्या या सहकार्यानंतर मेट्रो रेल्वे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेचीही तेवढीच काळजी घेणी आवश्यक आहे.
पाहा व्हिडीओ