National Highway in Danger: राज्यातील रस्त्यांची दुरवस्था नागरिकांना नवी नाही. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डयांवरून दरवर्षी गोंधळ उडत असताना आता राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पणापूर्वीच रस्त्याच्या कडा वाहून गेल्यानं नागरिकांच्या जीव धोक्यात आला आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश या आंतरराज्यीय राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरु होऊन आता 6 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही बांधकाम संथगतीनं सुरु असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत रस्त्याच्या कडाच वाहून गेल्यानं खळबळ उडाली आहे. या रत्यावरून ओव्हरलोड भरधाव वाहनं धावत असल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आता या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवक अध्यक्षांनी मागणी करण्यात आली आहे.


6 वर्षांपासून सुरु आहे बांधकाम


महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्यातून गेलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील मनसर ते मध्यप्रदेशातील बालाघाट - शिवनी पर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून आणि पुढे गोंदिया जिल्ह्यातून जातो. 2018 मध्ये या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीला सुरुवात झाली. मात्र, आता  6 वर्षांचा कालावधी लोटला असतानाही याचं बांधकाम अगदी संथगतीनं सुरू आहे. तुमसर तालुक्यातील सालई आणि उसर्रा या गावांदरम्यान नाल्यावर पुलाची निर्मिती करण्यात आलेली असून मागील महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीनं पुलाच्या भागातील रस्त्याच्या कडा वाहून गेल्यानं राष्ट्रीय महामार्ग धोकादायक झाला आहे. 


अपघाताची शक्यता वाढली


 या राष्ट्रीय महामार्गावरून ओव्हरलोड वाळूसह अन्य प्रकारची भरधाव वाहतूक होते. दरम्यान, याच महामार्गावरून शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेस, एसटी महामंडळाच्या बसेससह विविध प्रकारची वाहनं भरधाव जा. त्यामुळं या पूल परिसरात रस्त्याच्या कडा कोसळल्यानं भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.


बांधकामावर प्रश्नचिन्ह


कोट्यवधी रुपयांचा खर्च करून या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात येत असून लोकार्पणापूर्वीचं या महामार्गाची दुरवस्था झाल्यानं बांधकामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक अध्यक्ष यांनी केली आहे.