Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या (Khapa Police Station) हद्दीत बनावट तंबाखू कारखान्यावर धाड टाकत 19 लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. खापाच्या वेलतूर परिसरातील शेतातील घरात हा कारखाना चालू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याच ठिकाणी धाड टाकून बनावट तंबाखू कारखान्यावर कारवाई करण्यात आली.
या ठिकाणाहून 152 किलो सुगंधित तंबाखू, ब्रॅण्डेड कंपनीचे रिकामे डब्बे, पॅकिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटे, बॅच नंबर छापण्याचे प्रिंटर, पॅकिंग साहित्य असा 18 लाख 93 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी अन्न प्रशासन विभागाची मदत घेण्यात आली. यात मुख्य आरोपी दुर्गेश विजय अग्रवाल याचा शोध सुरु आहे. इतर तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यात खुला तंबाखू ब्रॅण्डेड कंपनीच्या डब्यात भरुन विकत असल्याची माहिती असून पुढील तपास सुरु आहे.
या घटनेतील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून आनंद बाळाजी वडीचार (वय 53 वर्षे, रा. दुर्गानगर), विजय प्रभाकर डुमरे (वय 46 वर्षे, रा. भरतवाडा) आणि राकेश रामेश्वर निनावे (वय 32 वर्षे, रा. दहेगाव-रंगारी, ता. सावनेर) यांना अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार फरार असलेला दुर्गेश आणि त्याच्या साथीदारांनी एक महिन्यापूर्वी वेलतूरमधील वाट यांच्या शेतात बनावट तंबाखू निर्मितीचा कारखाना सुरु केला. हा तंबाखू हुक्क्यात वापरला जातो. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. यानंतर याची शहानिशा केल्यावर ही माहिती सत्य आढळून आल्यावर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली. या छाप्यात पोलिसांनी हुक्क्यासाठी लागणारा तंबाखू (Hukka Tobacco), सुगंधित तंबाखूसह पॅकिंगसाठी लागणारे साहित्य असा एकूण 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना खापा पोलिसांच्या स्वाधीन केले. याठिकाणी तयार झालेला माल हा शहरातील हुक्का पार्लर संचालकांना पुरवण्याचं काम दुर्गेश करत होता अशी माहिती आहे.
उपराजधानीत बनावट ब्रॉन्डेड तंबाखू
शहरातील अनेक दुकानांमध्ये मोठ्या ब्रॉन्डच्या तंबाखूच्या नावावर या बनावट तंबाखूचा पुरवठा करण्यात येत होता. तसेच अनेक मोठे थोक विक्रेतेही याचा साठा मागवत होते अशी माहिती आहे. या सर्वांना पुरवठा करणारा दुर्गेश हा एकटा व्यक्ती नसून इतरही काही लोकांकडून इतर राज्यातून हा बनावट माल बोलवून पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे.
ही बातमी देखील वाचा