नागपूर : नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय तमाम पती महाशयांसाठी महत्त्वाचा आहे. केवळ वैवाहिक सुखासाठी एखादा पती, आपल्या पत्नीला नोकरी सोडण्याची बळजबरी करु शकत नाही, असा निर्वाळा नागपूर न्यायालयानं दिला आहे.

नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय देत एका विवाहितेचं आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राखलं आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण दाखल करणारा पती नागपुरातल्या सुखवस्तू कुटुंबातला आहे. तर त्याची पत्नी उत्तर प्रदेशात शिक्षिका म्हणून नोकरी करते.

पत्नीचा सहवास मिळत नाही, असं सांगत तिनं उत्तर प्रदेशातली नोकरी सोडून घरी परत यावं, यासाठी पतीनं कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केलं. मात्र कोर्टानं प्रकरण निकाली काढताना पत्नीच्या बाजून निकाल दिला.

नोकरीसाठी परराज्यात वास्तव्य करण्यात गैर काय? यावर निर्णय देताना कोर्ट म्हणालं, शिक्षणानुसार करिअर घडवण्याचा प्रत्येक स्त्रीला पूर्ण अधिकार आहे. पत्नीला करिअर घडवता यावं यासाठी पतीनं तिला पूर्ण मदत केली पाहिजे. नोकरीसाठी परराज्यात राहिलं म्हणजे वैवाहिक हक्क नाकारले असं म्हणता येणार नाही.

नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. विशेष म्हणजे पत्नीच्या बाजूनं कोणताही वकील उभा राहिला नसतानाही न्यायालयानं हा निकाल दिला आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे जेव्हा स्त्री यशाची शिखरं सर करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पतीनं तिला खंबीर पाठिंबा द्यायला हवा.