Nagpur News : पाऊस थांबल्यानंतर नागपुरात डासांची संख्या वाढण्यासोबतच डेंग्यूचा विळखा देखील घट्ट होऊ लागला असल्याचं स्पष्ट झालं आहे. नोव्हेंबर महिन्याच्या 22 तारखेपर्यंत नागपूरच्या शहर हद्दीत डेंग्यूचे 23 रुग्ण आढळून आले आहेत. संभाव्य धोके लक्षात घेऊन नागपूरकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
साधारणपणे पावसाळ्यात किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव दिसून येतो. ऑगस्ट महिन्यापासून पाणी साचू लागते आणि त्यानंतर डेंग्यूचा उद्रेक होत असल्याचा अनुभव आहे. यंदा मात्र पावसाळा चांगलाच लांबला. त्यानंतर लगेच थंडीला सुरूवात झाली नाही. दमट वातावरणामुळे डासांना पोषक वातावरण निर्माण होऊन सप्टेंबरपासून डेंग्यूचे रुग्ण समोर येणे सुरू झाले. पंधरवड्यात 16 रुग्ण तसा मोठा आकडा नसला तरी सप्टेंबरपासून आकडा फुगतच आसून ही धोक्याची सूचना आहे. जुलै, ऑगस्ट या दोन्ही महिन्यांत प्रत्येकी 10 रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबर महिन्यात ही संख्या थेट अडीचपट म्हणजेच 24 वर पोहोचली. ऑक्टोबरमध्ये रुग्णाचा आकडा 25 वर पोहोचला. नोव्हेंबरच्या पहिल्या 3 आठवड्यांमध्येच 23 रुग्ण आढळून आले. यावरून रूग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात येते. यामुळे नागरिकांनी सावध होऊन आवश्यक खबरदारी घेण्याची गरज भासू लागली आहे. मात्र 15 नोव्हेंबर नंतर रुग्णांची आकडेवारी घसरत असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन मनपाचे (NMC) वैद्यकीय अधिकारी नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.
फॉगिंगबाबत साशंकता
डास आणि डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन फॉगिंग सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानुसार महापालिकेने विविध वस्त्यांमध्ये फॉगिंग सुरू केले आहे. दक्षिण व पूर्व नागपुरातील काही वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून फॉगिंग सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पण, पूर्वीसारखा धूर दिसत नाही. पूर्वी धूर सोडल्यानंतर घरांमध्येही वेगळाच गंध यायचा, आता मात्र दाट धूर आणि गंध येत नसल्याचा दावा करीत नागरिकांकडून फॉगिंगवरच शंका उपस्थित केली जात आहे.
वर्षभरातील तपासण्या व पॉझिटिव्ह रुग्ण
महिना | तपासण्या | डेंग्यू बाधित रुग्ण |
जानेवारी | 03 | 02 |
फेब्रुवारी | 02 | 00 |
मार्च | 02 | 00 |
एप्रिल | 01 | 00 |
जून | 04 | 03 |
जुलै | 28 | 10 |
ऑगस्ट | 56 | 10 |
सप्टेंबर | 206 | 24 |
ऑक्टोबर | 285 | 25 |
नोव्हेंबर (22 पर्यंत) | 230 | 23 |
एकूण | 836 | 97 |
ही बातमी देखील वाचा