नागपूर : माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांना राज्य सरकारने एका आठवड्यात दुसऱ्यांदा दणका दिला आहे. लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भाडेपट्टीवर दिलेली जमीन परत का घेण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावली आहे.

प्रकरण काय आहे?

लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला 1990 च्या दशकात तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मौजा डिगडोह तालुका हिंगणा इथे अनेक एकर जमीन 30 वर्षांच्या भाडेपट्टीवर प्रतिवर्ष एक रुपया भाड्याप्रमाणे देण्यात आली होती.

गेल्या काही वर्षात या महाविद्यालयाचा काम पाहणारी संस्था व्हीएसपीएम ने शैक्षणिक वापरासाठी दिलेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याचे तक्रारी समोर आले. त्यानंतर प्रशासनाने त्याची रीतसर चौकशी केली. त्यामध्ये तथ्य आढळल्यानंतर आता नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शैक्षणिक वापरासाठी दिलेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्या प्रकरणी आणि भाडेपट्टीच्या अटींचा भंग केल्या प्रकरणी व्हीएसपीएम या संस्थेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे. तसेच संस्थेला देण्यात आलेली जमीन परत का घेण्यात येऊ नये, असे ही प्रश्न विचारात पुढील 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांनी भाजप विरोधात आणि खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उघड भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता बजावलेल्या या नोटीसचा संबंध आशिष देशमुख यांच्या राजकीय भूमिकेशीही लावला जात आहे.

दरम्यान, आयडीबीआय बँकेचे कर्ज न फेडल्याप्रकरणी मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात गेल्याच आठवड्यात रणजित देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली होती.