नागपूर : नागपूर-अमरावती रोडवर झालेल्या भीषण अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडण्यापूर्वी गाडीतच तरुण-तरुणींनी इन्स्टाग्रामवर केलेला लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. लाऊड म्युझिकवर ठेका धरताना वाढवलेला स्पीड अपघाताला कारणीभूत ठरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


नागपूरच्या वडधामना भागात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता हा अपघात घडला. सर्व तरुण-तरुणी कॉलेजमधून अमरावती रोडवर लाँग ड्राईव्हला निघाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. तरुणांनी जोशात अर्टिगा कारचा वेग वाढवल्यामुळे हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे.

भरदुपारी महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात विशाल रथवाणी, सत्या सिंग, धीरज पाथडे, मैत्रेय आवळे, निशा निकम, दिव्या पाकू आणि परवीन खान या सात तरुण-तरुणींचा मृत्यू झाला. तर शहाबाज अल्वी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

इन्स्टाग्रामवर केलेल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये एका पंजाबी गाण्यावर सर्व जण थिरकताना दिसत आहेत. लाईव्ह सुरु असतानाच एका तरुणीच्या आईचा फोन आला. त्यामुळे लगेच म्युझिक बंद करण्यात आलं. आईला काय सांगायचं? असा प्रश्न पडताच ट्यूशनला जात आहे असं सांग, असा सल्ला तिच्या मित्रमंडळींनी तिला दिला.

व्हिडिओ सुरु असताना कारचा स्पीड खूप जास्त असल्याचं दिसतं. फ्रंट सीटवर बसलेले दोन्ही तरुण (कार ड्राईव्ह करणाऱ्या तरुणासह) वेगवान कारमध्ये सेल्फी काढण्याचा धोका पत्करताना दिसतात.

हे सर्व तरुण-तरुणी दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत नागपुरातच होते. दुपारी कॉलेजला एकत्र आले. त्यानंतर विशाल रथवाणीने आणलेल्या अर्टिगा कारमध्ये लाँग ड्राईव्हला जाण्याचा प्लॅन त्यांनी आखल्याचं पोलिस तपासात समोर आलं.

त्यांची कार नागपूरपासून गोंडखैरीपर्यंत गेली आणि तिथून परत येत असल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आलं. या लाँग ड्राईव्हमध्ये हे सर्व कोणत्या ढाब्यावर थांबले होते का, याचा शोधही पोलिसांनी सुरु केला आहे.

या घटनेनंतर काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना फोन केला, तेव्हा पोलिसांचा प्रतिसाद हा धक्कादायक होता. पहिल्यांदा फोन केल्यावर पोलिसांनी पोलिस स्टेशन कोणतं असा प्रश्न विचारला. दुसऱ्यांदा फोन केल्यावर ज्या ठिकाणी अपघात झाला ती शहराची हद्द नाही तर ग्रामीणची आहे अशी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप आहे.

कोणतेही पोलिस पाठवा असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यावर अंगात आल्यासारखं वागू नका, असं संतापजनक उत्तर नियंत्रण कक्षातून देण्यात आलं. यामुळे पोलिसांमध्ये संवेदनशीलता शिल्लक राहिली नाही का, असा प्रश्न पडत आहे.

पाहा व्हिडिओ: