नागपूर : सुट्टीनिमित्त रविवारी वेणा जलाशयात गेलेल्या 11 तरुणांची बोट बुडाली. यातील तिघांना वाचण्यात यश आलं आहे. तर सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून, उर्वरित दोन जणांचा शोध अजूनही सुरु आहे. काल संध्याकाळी ही दुर्घटना घडली.


धक्कादायक म्हणजे जलाशयात गेलेल्या या तरुणांनी दुर्घटनेपूर्वी फेसबुक लाईव्हही केलं होतं. मात्र काही क्षणातच काळानं त्यांच्यावर घाला घातला.

ज्या तिघांना वाचवण्यात आलंय, त्यामध्ये दोन नाविकांसह एका पर्यटकाचा समावेश आहे.

काल संध्याकाळी दुर्घटनेनंतर तातडीने शोधकार्य सुरु झालं होतं, मात्र अंधारामुळे काही वेळाने शोधकार्य थांबवण्यात आलं. आज सकाळी पाच वाजता  मदतकार्य सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र सात वाजले तरी ते सुरु झालं नव्हतं.

काय घडलं नेमकं?

नागपुरातील 9 तरुण रविवारच्या सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी वेणा जलाशयावर गेले होते. त्यावेळी दोन नाविकही त्यांच्यासोबत होते. हे तरुण नावेत बसून जलाशयात गेले, मात्र अधिक वजन झाल्यानं ही नाव पलटली.

हे सर्व तरुण 25 ते 30 वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. जलाशयात फेरफटका मारताना त्यांनी फेसबुक लाईव्हही केलं. यात त्यांनी बोटीमध्ये पाणी येत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्यापैकी कुणालाच पोहता येत नाही, शिकलो असतो तर बरं झालं असतं, असंही म्हणाले आहेत. त्यामुळे बोट नेमकी कशामुळे उलटली याचाही शोध सुरु आहे.

रात्री 9.30 पर्यंत शोधमोहीम सुरु होती, मात्र अंधारामुळे ही शोधमोहिम थांबवण्यात आली. सकाळी 7 वाजेपर्यंत मदतकार्य सुरु झालं नव्हतं.

बुडण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह

बोट उलटण्यापूर्वी या तरुणांनी फेसबुक लाईव्ह केलं. यात त्यांनी आपण मस्त एन्जॉय करत असल्याचं सांगितलं. तसंच आपल्यापैकी कुणालाच पोहता येत नसल्याचं सांगितलं. फेसबुक लाईव्हमध्ये दिसणारा आनंद मात्र काही काळच टिकला.

एकटा पोहत-पोहत काठावर आला

या नावेतला अतुल ज्ञानेश्वर बावणे सोडून इतर कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता सर्वच्या सर्व पाण्यात बुडाले. अतुल कसा बसा पोहत काठावर आला.

जलाशयात मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या मदतीने लगेच बचावकार्य सुरू करण्यात आलं. कोळी बांधवांनी रात्री 9.30 पर्यंत एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मात्र, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. आज सकाळी दुसरा मृतदेह हाती लागला.

वेणा नदीत फिरायला गेलेल्या तरुणांची नावं

  1. अमोल मुरलीधर दोडके (28),

  2. रोशन मुरलीधर दोडके,

  3. राहुल जाधव

  4. अंकित अरुण भोसकर (22),

  5. परेश काटोके,

  6. पंकज डोईफोडे,

  7. रोशन ज्ञानेश्वर खांदारे (23)

  8. प्रतीक आमडे,

  9. अक्षय मोहन खांदारे

  10. अतुल भोयर

  11. अतुल ज्ञानेश्वर बावणे (नावाडी)


सापडलेले मृतदेह

  1. अंकित अरुण भोसकर

  2. राहुल जाधव

  3. रोशन ज्ञानेश्वर खांदारे (23)

  4. परेश काटोके


बचावलेले तरुण

  1. अमोल मुरलीधर दोडके

  2. रोशन मुरलीधर दोडके

  3. अतुल ज्ञानेश्वर बावणे (नावाडी)