मुंबई : राज्य शासनाची कोरोनाच्या काळातील घरोघरी जाऊन रुग्ण तपासणीची मोहीम सध्या संपूर्ण राज्यात सुरु आहे. मात्र या मोहिमेत काम करण्यासाठी त्यांनी खासगी रुग्णालयातील परिचारिका आणि अन्य वैद्यकीय सहाय्यकांना नोटीस पाठवून या कामात सहभागी होण्याचा फतवा काढला आहे. अगोदरच लहान नर्सिंग होम किंवा छोट्या रुग्णालयात या काळात कुणी आरोग्य कर्मचारी येत नाहीत, आहे त्या तुटपुंज्या कर्मचारी वर्गावर ही रुग्णालये तग धरून आहेत, त्यातील कर्मचारी वर्ग जर शासनाने या कामाला जुंपला तर रुग्णालये चालवायची कशी? आमची हॉस्पिटल चालविणे आमची जबाबदारी नाही का? असे प्रश्न सध्या पेण तालुक्यातील डॉक्टरांना पडला असून तेथील स्थानिक डॉक्टरांच्या संघटनेने याविरोधात प्रांत अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून पत्र लिहिले आहे.
कोरोनाच्या विरोधात राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम राज्यात सुरु केली असून या अंतर्गत राज्यातील घरोघरी आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक भेटी देऊन कुटुंबियांच्या आरोग्याची माहिती घेणार आहे. जर कुणी संशयित आढळल्यास त्यांना तात्काळ उपचार देण्याची व्यवस्थान केली जाणार आहे. ही मोहीम शासनाने 15 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात सुरु केली आहे. दोन टप्प्यात या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी होणार आहे. या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधींनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मात्र शासनाची ही मोहीम राबवत असताना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील छोट्या रुग्णालयाना नोटीस काढून तेथील नर्सिंग स्टाफ या कामासाठी पाठवावा अशी नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याप्रकरणी, पेण येथील स्थानिक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रवीण म्हात्रे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले कि, "या कोरोना काळात अगोदरच छोट्या रुग्णालयातील बराच स्टाफ कामावर यायला मागत नाही. त्यामुअळे अगदी कमी प्रमाणात असणाऱ्या स्टाफ वर आमच्या येथील डॉक्टर रुग्णालये चालवत आहेत. अनेक स्टाफ चे पालक त्यांना रुग्णालयात पाठविण्यास नकार देत आहे, त्यांना ही नोकरीही नको असे त्यांनी सांगितले आहे. मात्र रुग्णालयात तीन ते चार नर्सिंग स्टाफची मदत घेऊन ही या तालुक्यातील 20 रुग्णालये सुरु आहे. त्यातील 10 रुग्णालयातील नर्सेसना शासनाने नोटीस पाठवून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेच्या कामाकरिता पाठवा अशी मागणी केली आहे. अगोदरच कमी असणारा नर्सिंग स्टाफ हा जर मोहिमेवर गेला तर रुग्णालये चालवायची कशी हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे. अगोदरच रुग्णालयात काम करणारा स्टाफ आम्ही त्यांना सांभाळून त्यांच्याकडून काम करून घेतोय. त्यांना जर मोहिमेवरचे काम लावले तर ते नोकरीच सोडून जातील."
ते पुढे असेही म्हणतात कि, "आम्ही शासनाला मदत करायला तयार आहोत मात्र आमच्या रुग्णालयाची परिस्थिती अगदी बिकट आहे. आम्ही सर्वच जण कोविड आणि कोविड नसणारे रुग्ण या रुग्णालयात उपचार करत असतो. त्यामुळे आम्ही प्रांत अधिकाऱ्यांनी काढलेल्या नोटीचा फेर विचार करून या कामातून नर्सेस स्टाफला सूट द्यावी अशी विनंती केली आहे."
राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढत असून याला आळा घालण्याकरिता ही मोहीम यशस्वी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. त्याकारिता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसोबत, स्वयंसेवकांनी लोकांच्या घरी तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
याप्रकरणी, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र, अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले कि, "आज पेण रुग्णालयातील छोट्या रुग्णालयातील स्टाफची मागणी झाली आहे उद्या राज्यातील इतर खासगी रुग्णालयातील स्टाफची मागणी होण्याची शक्यता नाकरता येत नाही.या छोट्या रुग्णालयाच्या स्टाफ संदर्भात खूप अडचणी आहे कुणी कामावर यायला मागत नाही आहे. त्यामुळे आहे त्या स्टाफ मध्ये रुग्णालये चालविणे अगोदरच जिकरीचे झाले आहे. त्यामुळे तेथील आमच्या शाखेच्या अध्यक्षांनी फोन करून सांगितल्यावर, या संदर्भात मी तेथील रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी याप्रकरणी फोन करून आम्ही आमच्या सदस्यांची कैफियत मांडली आहे."