बीड : राज्यातील ग्रामीण भागातील सगळ्यात मोठे सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल हे बीडच्या अंबाजोगाई शहरालगत लोखंडी सावरगाव येथील उभारण्यात आलेले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयाचे व्हर्चुअल उद्घाटन केले होते तर सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रिबीन कापून या हॉस्पिटलचे लोकार्पण केले होते.


यावेळी एक हजार बेडच्या क्षमतेच्या या रुग्णालयात 800 बेड उपलब्ध असल्याचे शासनाच्या वतीने सांगितले होते. आज प्रत्यक्षात या ठिकाणी 325 बेडच उपलब्ध आहेत. रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या या हॉस्पिटलला सुसज्ज इमारत लाभली, मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा आणि साधनसामुग्रीचा अभाव असल्याने या रुग्णालयात रुग्णसेवेबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे, असा आरोप भाजपाच्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे.


रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे कोरोनाच्या रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध होत नाही. दर्जेदार सेवा देण्यासाठी शासनाने रिक्त जागा, ऑक्सिजन प्लांट, सिटी स्कॅन मशीन आणि सर्व प्रकारच्या तपासण्या रुग्णालयाला उपलब्ध करुन द्याव्यात. कोरोना रुग्णांसाठी हे रुग्णालय सुसज्ज आणि अत्याधुनिक करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केल्याचं नमिता मुंदडा यांनी सांगितलं.



काय आहेत नमिता मुंदडा यांच्या मागण्या?


1) आज तारखेला 325 बेड रेडी आहेत त्यात 370 बेड अॅडजेस्ट करता येतात. त्यापैकी 267 रुग्ण दाखल आहेत.


2) 448 ऑक्सिजन बेडचा उल्लेख दाखवला आहे, प्रत्यक्षात 140 ऑक्सिजन बेड आहेत. बाकीचे बेड तयार होण्यासाठी वेळ लागणार आहे त्यासाठी पुढील अडचणी येत आहेत


1) ऑक्सिजन प्लांट उभा करणे.
2) नवीन जनरेटर बसवणे.
3) त्या भागात स्ट्रीट लाईट बसवणे.
4) पाण्यासाठी पाच हजार लिटरच्या दहा टाक्या बसवणे.
5) वार्ड बॉय/स्टाफ नर्स/टेक्निशियन यांच्या जागा भरणे.
6) ड्रनेज लाईन करणे.
7) सध्या 67 व्हेंटिलेटर आहेत परंतु त्यासाठी लागणारे भूलतज्ज्ञ/चेस्ट फिजिशियन/फिजिशियन पूर्णवेळ शिफ्ट वाईज आजही नाहीत.
8) सिटीस्कॅन मशीन त्वरित बसवणे.


वरील सर्व अडचणी सोडवल्या तरच 800 बेड तयार होतील अन्यथा 350 बेड आहेत असेच म्हणावे लागेल, असं नमिता मुंदडा यांचं म्हणणं आहे.