वर्धा : वर्ध्या जिल्हाताली कारंजा (घाडगे) येथे प्रेमसंबंधाच्या कारणातून मुलीच्या वडिलानं युवकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारंजात एकच खळबळ निर्माण झाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Continues below advertisement


कारंजातील इंदिरानगरमध्ये सोमवारी रात्री हत्येचा थरार घडला आहे. मुलाचे आणि मुलीचे प्रेमसंबंध यासाठी कारण ठरलं आहे. कारंजा (घाडगे) इथं वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या अतुल दुधकोवळे याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या वडिलांना माहिती झाली. त्यावरून आठ दिवसांपूर्वी मुलीचा प्रियकर अतुल आणि मुलीच्या वडिलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी रात्री मुलीचा प्रियकर घरापुढे उभा असताना पुन्हा वाद झाला. या वादातून लोहार काम करणाऱ्या शिवा पोटमासे याने अतुलवर धारदार शस्त्रानं वार केले. या हल्ल्यात अतुल गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.


घटनेनंतर शिवा पोटमासे पसार झाला आहे. याबाबत मृत अतुल दुधकोवळे याच्या आईने पोलिसात तक्रार केली आहे. पाच वर्षांपासून अतुल आणि मुलीचे प्रेमसंबंध होते. पण या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी प्रियकराची हत्याच केली. या घटनेमुळे कारंजा शहर सुन्न झालं आहे. प्रेमसंबंधांना अनेकवेळा विरोध होतोच. मात्र या थराला जावून त्याचा अंत होणे निश्चितच क्लेषदायक आहे.