नाशिक : मुलीच्या लग्नात तिचा प्रियकर अडथळा आणेल या कारणास्तव मुलीच्या आईने कट रचत प्रियकराची हत्या केली. मुलगा, भाऊ, मुलीचा होणारा नवरा आणि त्याचा मित्र यांच्या मदतीने कृत्य केले.
तळेगाव जवळील कातोरेवाडी येथे राहणाऱ्या चांगुनाबाई मेंगाळ यांच्या मुलीचा 7 जूनला कैलास फसाळे सोबत विवाह होणार होता. मात्र त्यांच्या मुलीचे कातोरेवाडीतच राहणाऱ्या 20 वर्षीय पंडित खडके या विवाहीत तरुणासोबत वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. पंडित आपल्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही त्यात तो विघ्न आणेल या भितीपोटी चांगुणाबाई यांनी आपला मुलगा, भाऊ यासोबतच मुलीचा होणारा नवरा आणि त्याच्या मित्राला सोबत घेत पंडितचा खून करण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला.
26 मे ला लग्नाची पार्टी साजरी करण्याचे निमित्त सांगत पंडित खडके आणि चार पुरुष आरोपी वैतरणा धरणा जवळील ओंडली गावच्या परिसरात एकत्र आले. त्यानंतर पंडितला दारू पाजत त्यांनी त्याचा गळा आवळून खून केला तसेच मृतदेहाचीही त्यांनी विल्हेवाट लावली..
चार दिवसांपूर्वी म्हणजेच 11 जूनला ओंडली शिवारात एका मृतदेहाचा सांगाडा कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याची माहिती काही नागरिकांनी ग्रामीण पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्याच काम सुरु करताच 1 जूनला ईगतपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या मिसिंगच्या तक्रारीनुसार तो मृतदेह पंडित खडकेचा असल्याचं निष्पन्न झाले. मयत पंडीतच्या आईने चांगुनाबाई मेंगाळचा या दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता असे पोलिसांना सांगत संशय व्यक्त करताच पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. चांगुनाबाईला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आणि हे सर्व धक्कादायक वास्तव समोर आलं.
घोटी पोलिसांनी याप्रकरणी प्रेयसीची आई चांगुनाबाई मेंगाळ तिचा पहिल्या पतीचा मुलगा विलास गावंडा, भाऊ प्रकाश झुगरे तसेच चांगुनाबाईचा जावई कैलास फसाळे आणि त्याचा मित्र राजू ठोंबरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून या सगळ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे हे सर्व गुन्हेगारी कृत्य केल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात यातील मुख्य सूत्रधार चांगुणाबाईने कैलास फसाळे सोबत आपल्या मुलीचा नियोजित विवाह सोहळाही पार पाडला.