परभणी : आजारी असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील मुदगल येथे घडली आहे.


पाथरी तालुक्यातील मुदगल येथील कमलाकर बाबासाहेब शिंदे यांची पत्नी कविता शिंदे आजारी असल्याने सतत गोळ्या औषध लागत होते. बायकोच्या गोळ्या औषधाला कंटाळून कमलाकर शिंदे यांनी पत्नी कविता शिंदे यांचा धारदार शस्त्राने हत्या केली.  हा प्रकार 13 मार्च रोजी रात्री 7.30 च्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी सुरज मदनराव जामगे यांच्या फिर्यादीवरून काल कमलाकर शिंदे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


कविता शिंदेंना होता ब्रेन ट्यूमर


कविता शिंदे यांना ब्रेन ट्यूमर होता. त्यांच्यावर मागच्या पाच वर्षापासून औषध उपचार सुरू होते. शिर्डी येथील रुग्णालयात ही त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर सतत त्यांना औषध उपचार लागायचा. परंतु हे औषध उपचार करण्यासाठी कमलाकर शिंदे यांच्याकडे पैसे नसल्याने ते वैतागले होते. यातूनच त्यांनी हे गंभीर कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.