औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेचे उपमहापौर आणि भाजप नेते विजय औताडे यांच्याविरोधात महापालिकेच्याच एका अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे. एस.ए. चाहेल असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. पाणीपुरवठा विभागात ते उपअभियंता म्हणून काम करतात.


शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, मारण्याचा प्रयत्न करणे असे आरोप या अधिकाऱ्याने या तक्रारीत केले आहे.  मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली त्यावेळी सभा  संपल्यानंतर उपमहापौरांनी अँटी चेंबरमध्ये बोलावले आणि त्यांच्या वार्डातील कामाच्या टेंडरवर सही करायला सांगितली असा आरोप या अधिकाऱ्याने केला.

मात्र ते नियमांत बसत नसल्यानं त्यावर तसा शेरा मारला म्हणून उपमहापौर भडकले आणि त्यांनी मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चाहेल यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात अर्ज दिला आहे, तर मनपा आयुक्तांनाही तसं पत्र या अधिकाऱ्यानं पाठवलं आहे. या पत्रात कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा हेमंत कोल्हे यांनीही दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

उपमहापौर विजय औताडे यांच्या वार्डात विना परवाना पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु आहे, यावर आक्षेप घेतला होता, म्हणूनही त्यांना राग असल्याचं चाहेल यांनी त्यांच्या पत्रात लिहलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी चाहेल यांनी केली आहे.

दरम्यान ही भाजपची गुंडशाही असल्याचा आरोप एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.  तर हा प्रकार सभागृहात झाला आहे, त्याची चौकशी करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

औरंगाबादच्या उपमहापौरांचा वाजपेयींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी