मुंबई: पहाटे पडत असलेल्या दाट धुक्यांमुळं मुंबईसह राज्यात थंडीचं आगमन झाल्याचं चित्र आहे. या थंडीची आतुरतेनं वाट पाहत असलेले लोक यामुळे सुखावले आहेत. मुंबई मध्ये गेले दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पहाटे पासून मुंबईवर दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. मुंबईचा पारा देखील खाली आला असून मुंबईकर गुलाबी थंडीचा आनंद घेत असल्याचं सर्वत्र चित्र आहे.
गेले दोन दिवस मुंबईचे वातावरण ढगाळ होते. मात्र काल रात्री पासून दक्षिण मुंबई, मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणत धुकं पसरलेलं आहे. या दाट धुक्यांमुळे पहाटेपासून रस्त्यांवरचं काहीच दिसत नाही. त्यामुळे चालकांना वाहने देखील सावकाश चालवावी लागत आहे. पवईच्या तलावावरदेखील अशीच धुक्याची चादर दिसून येत आहे.
मुंबईतील हवेत गारवा चांगलाच वाढल्यानं पहाटे व्यायाम करण्यास तसेच निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. इतके दिवस कोरोनामुळे घरात असलेले मुंबईकर आता पहाटे मात्र या धुक्यात आणि गुलाबी थंडीत बाहेर पडून त्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
सिंधुदुर्गातही दाट धुकं
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र दाट धुकं पसरल्याचं चित्र आहे. महत्वाचे रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत आहेत. गेली काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण ढगाळ आहे. अचानक कधी पाऊस पडतो तर कधी कडाक्याची थंडी पडत असल्याचं पहायला मिळते.
आंबा उत्पादक संकटात
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत वातावरणात बदल जाणवत आहेत. आज दाट धुक्याची पांढरी चादर सर्वत्र पसरली आहे. काही लोकांसाठी ही गुलाबी थंडी हवीहवीशी वाटत असली तरी बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे. या वातावरणाच्या लहरीपणाचा जिल्ह्यातील प्रमुख फळपिक असलेल्या आंब्याला सर्वाधिक फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे आंब्यावर औषधे फवारण्याची आवश्यकता भासणार आहे. या अतिरिक्त खर्चामुळे औषध फवारणीमुळे आंबा उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. तसेच मोहोरावर करपा रोग पडण्याची शक्यताही जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा संकटात सापडला आहे.
राज्यभरात थंडीचा जोर
राज्यातील काही भागात गेल्या चार दिवसात तुरळक पाऊस पडला होता. आता राज्यातील बहुतांश भागात थंडीनं जोर खाल्ला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानाच झपाट्यानं घट झाली आहे. पुढील काही दिवसात हे थंडीचं चित्र कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
पहा व्हिडिओ:Nashik Fog | नाशिक शहरावर दाट धुक्याची चादर; गोदोकाठ, मंदिरं, रस्ते धुक्यात हरवले