मुंबई: नाताळासोबत जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक लोक घराबाहेर पडल्याचं पहायला मिळतंय. हजारोंच्या संख्येने शहरातील पर्यटक राज्यातल्या विविध पर्यटन स्थळांकडे रवाना होत आहेत. याचा परिणाम राज्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होण्यात झाला आहे.


सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी
सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सिंहगडावर जाण्यासाठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झालीय. सिंहगडावर गेलेली वाहन जोपर्यंत खाली परत येत नाहीत तोपर्यंत खालच्या वाहनांना वर न पाठवण्याचा निर्णय पोलीस आणि वन विभागाने घेतला आहे. सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध कोंढणपूर फाट्याजवळ वाहनांना थांबवण्यात आलंय. त्यामुळे सिंहगडावर जाण्यासाठी निघालले पर्यटक कित्येक तास या वाहतूक कोंडीत अडकून पडलेत. सिंहगडावर जाणारा रस्ता अरूंद असल्यानं अनेक ठिकाणी वाहनं समोरसमोर आल्याने वाहतूक कोंडी झालीय.


अलिबागजवळ वाहनांची मोठी रांग
सलग सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणांनाही प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे अलिबागजवळ वाहनांची मोठी रांग लागली आहे. मुंबई आणि पुण्याहून अलिबाग आणि मुरूडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागल्याने या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबाग शहर ते कार्लेखिंड दरम्यान दुपारपर्यंत वाहनांच्या सुमारे 4 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.


मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग
या काळात शहरातील नागरिक आपल्या गावी जात आहेत तसेच निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतील नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराबाहेर पडताना दिसत आहेत. याचाच परिणाम म्हणून सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर खालापूरनजीक वाहनांची चार ते पाच किमीची भली मोठी रांग लागली होती. खालापूर टोल नाक्याजवळ आणि पुढे बोरघाटातही वाहतूक कोंडी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाश्यांना अनेक तासांपासून या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.. खालापूर टोलजवळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत तर, बोरघाटात अमृतांजन ब्रिजवर मुंबईच्या दिशेला वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.


शेगाव येथे भाविकांची गर्दी
आज सलग दुसऱ्या दिवशी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात भाविकाँची गर्दी वाढली आहे. .अनेक भक्त कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीये. त्यामुळे शेगाव प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अचानक बिना मास्क फिरणाऱ्या भाविकांवर कारवाई सुरु केली आहे. शेगाव येथे भाविकांची गर्दी वाढली असून उद्याही यापेक्षा जास्त गर्दी होणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेगाव येथे येताना भाविकानी कोरोना नियम पाळावेत असं अवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे


पहा व्हिडिओ: Khalapur Toll Naka | मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी



महत्वाच्या बातम्या: