कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'मी कोल्हापुरात परत येणार' असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना टोला लगावण्याची, चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. आधी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावल्यानंतर हसन मुश्रीफ यांनीही पाटील यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध सर्वांना माहित आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला परत जाण्याचं वक्तव्य केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातील कोथरुड मतदार संघ निवडला त्याचवेळी त्यांच्यावर टीका झाली होती. आता पाटलांनी कोल्हापूरला परत येणार असल्याचं वक्तव्य केल्यामुळे चर्चा तर होणारच.
दादांचे ते वक्तव्य भाजप पक्षातील विरोधकांसाठी : सतेज पाटील
दुसरीकडे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. "चंद्रकांतदादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातील आहेत. कदाचित त्यांचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असावा, असं सतेज पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
पुण्यातील कार्यक्रमात मी कोल्हापूरला परत जाणार असं खेळीमेळीतच चंद्रकांत पाटील वक्तव्य केलं होतं. "पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावंसं वाटतं. पण, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे, असं म्हणत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. कोल्हापूरच्या मतदारसंघाकडे पाठ फिरवत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघाची निवड करत सोपी खेळी खेळली अशा आशयाचे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. किंबहुना हे आरोप सातत्याने सुरुच आहेत. परिणामी राजकीय कारकिर्दीतील पुढची निवडणूक ही कोल्हापुरातूनच लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं : अजित पवार
अजित पवार म्हणाले की, "एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, मी पुन्हा येईन पण म्हणणार नाही, मी पुन्हा जाईन पण म्हणणार नाही...मी जनतेच्या सहकार्याने काम करत राहिन." चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, "मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं? पाच वर्षांसाठी तुम्हाला निवडून दिलंय, वर्षाच्या आतच तुम्ही पुन्हा जाईन म्हणताय. मग काम घेऊन आलेल्या कोथरुडकरांना मी पुन्हा जाणार सांगणार का?"
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी याआधीही अनेक वेळा अशा पद्धतीची वक्तव्ये करुन राज्यात चर्चेसाठी विषय तयार केला. आता मी कोल्हापूरला परत जाणार या वक्तव्यामुळे विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दादा नेमके कधी परत येणार आणि कोल्हापूरकर त्यांचे कसे स्वागत करणार हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या