Mumbai Pune ExpressWay : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS (इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठी शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जातोय. ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हरहेड ग्रँटी हा होय. त्यााण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12 ते 2 दरम्यान ब्लॉक घेतला जातोय. किवळे ते सोमटने यादरम्यान हे काम सुरू होतंय. या दोन तासासाठी वाहतूक जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे. 


मुंबई पुणे एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातल्या दोन महानगरांना जोडणारा दुवा होय. पण हाच दुवा प्रवाशांच्या जीवावर उठलाय. विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला. त्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 


आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम होय. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39  ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत. 




शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर एबीपी माझानं मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरचा मध्यरात्रीचा प्रवास पूर्ण करुन या महामार्गातल्या त्रुटी सरकारला दाखवून दिल्या होत्या. त्याच रिपोर्टची दखल घेऊन अखेर सरकारनं महामार्ग सुरक्षेच्या दिशेनं मोठं पाऊल उचललेलं आहे. आता फक्त हा प्रकल्प तातडीने पूर्ण होऊन. प्रवाशांना सुरक्षा कवच मिळावं, इतकीच अपेक्षा आहे.


आयटीएमएस सिस्टीम काय आहे? 



ITMS - इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम
- वाहनं टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
- यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील. 
- ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
- सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
- अशावेळी द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
- अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याची ही कल्पना सेन्सर मुळं मिळेल
- अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल अन तातडीची मदतही पोहचेल.